स्टोक आॅन ट्रेंट (यूके) : स्टोक सिटी संघावर दणदणीत विजय मिळवत चेल्सीने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या विजयाने चेल्सीला ख्रिसमस जल्लोषात साजरी करण्याची संधी मिळाली आहे. जॉन टेरी, सेक फाब्रीगास यांनी प्रत्येकी एक गोल करून चेल्सीच्या विजयावर २-० अशी मोहर उमटवली.या सामन्यात जोस मॉरिन्हो संघाकडून अपेक्षित कामगिरी झाली नसली तरी गत लढतीत याच ब्रिटानिया स्टेडियमवर आर्सेनलचा २-३ असा पराभव झाला होता. त्या तुलनेत मॉरिन्होच्या संघाने साजेसा खेळ केला. रविवारी पार पडलेल्या सामन्यात मॅन्चेस्टर सिटीला क्रिस्टल पॅलेसने बरोबरीत रोखले होते आणि त्यामुळे त्यांचे व चेल्सीचे गुण समसमान झाले. मात्र, चेल्सीने दमदार खेळ करून अव्वल स्थान काबीज केले. बेल्जियमचा इडन हजार्ड याची दुखापत ही एकमेव बाब चेल्सीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. स्पर्धेतील ही निराशाजनक कामगिरी होती. चेल्सीकडून काऊंटर अटॅक होईल हे माहीत असूनही तशी संधी त्यांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे आमच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या, असे मत स्टोक सिटीचे व्यवस्थापक मार्क ह्युजेस यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, चेल्सीकडून सामना खेचून घेण्याचे प्रयत्न फसले. काही क्षणी आम्ही आघाडी घेऊ असे वाटले होते, परंतु आमचे प्रयत्न अपुरे पडले. पुढील सामन्यात सकारात्मक दृष्टिकोनातून मैदानात उतरू. हा विजय ३ गुणांच्या आंनदापलीकडचा असल्याचे चेल्सीचे व्यवस्थापक जोस मॉरिन्हो यांनी सांगितले. ते म्हणाले, विजय मिळवून तीन गुणांची कमाई करणे हे खेळाडूंचा उत्साह आणि मानसिक कणखरता वाढविण्यासाठी गरजेचे होते. तीन सामने शिल्लक असून, त्यात लय कायम राखू.
स्टोक सिटीला नमवत चेल्सी अव्वल स्थानावर
By admin | Published: December 24, 2014 1:49 AM