पॅरिस : यंदाच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील सर्वांत खळबळजनक विजयाची नोंद करताना आइसलँडने इंग्लंडला २-१ असे हरवून स्पर्धेबाहेर केले.आइसलँडने जगभरातील फुटबॉलप्रेमींना आश्चर्याचा धक्का देताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांची लढत यजमान फ्रान्सबरोबर होणार आहे. सामन्यातील पहिला गोल इंग्लंडकडून करण्यात आला. चौथ्या मिनिटाला आइसलँडच्या गोलकिपर हॅनस होलार्डसनने इंग्लंडच्या रहिम स्टेर्लिंगला पोस्टच्या आत धोकादायकपणे पाडले होते. यामुळे इंग्लंडला मिळालेल्या पेनल्टी किकचे इंग्लंडच्या वेन रुनीने सोने केले. ही चूक आइसलँडला महाग पडणार असे वाटत असताना त्यानंतर केवळ दोनच मिनिटांनी आइसलँडने बरोबरी केली. सिगुर्दसनने गोलपोस्टजवळून गोलकिपरला चकवून गोल नोंदवला. सामना बरोबरीत चालला असताना आइसलँडच्या कोल्बेन सिग्थार्बसनने इंग्लंडची बचावफळी भेदत संघाला २-१ असे आघाडीवर नेले. दरम्यान, स्पर्धेतील अपयशामुळे संघाचे व्यवस्थापक रॉय हॉजसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बलाढ्य इंग्लंड स्पर्धेबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2016 5:42 AM