म्हैसूर : सूर्यकुमार यादवच्या (११०) झुंजार शतकाच्या जोरावर गतविजेत्या बलाढ्य मुंबईने रविवारी रणजी ट्रॉफी सामन्यात रेल्वेविरुद्धच्या पहिल्या डावात ३४५ धावांची आव्हानात्मक मजल मारली. यानंतर मुंबईकरांनी दुसऱ्या दिवसअखेर रेल्वेची ३ बाद ७६ अशी अवस्था केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या मुंबईकरांची सुरुवात भक्कम झाली. सलामीवीर कौस्तुभ पवार (७) स्वस्तात परतल्यानंतर अखिल हेरवाडकर (९६) आणि श्रेयश अय्यर (७०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची दमदार भागीदारी केली. करण ठाकूरने अय्यरला बाद करुन ही जोडी फोडली. अय्यरने ७३ चेंडूत १० चौकार व एक षटकार मारला. यानंतर हेरवाडकर - सुर्यकुमार यादव जोडी जमली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. परंतु, हेरवाडकर शतकाच्या उंबरठ्यावर असताना कर्ण शर्माचा शिकार ठरला. त्याने २०२ चेंडूत १५ चौकार व एका षटकारासह संयमी खेळी केली. यानंतर मुंबईच्या डावाला गळती लागली. १३८ धावांत ७ बळी गेल्याने मुंबईचा डाव मर्यादित राहिला. परंतु, एका बाजूने खंबीरपणे लढलेल्या सुर्यकुमारमुळे मुंबईने आव्हानात्मक मजल मारली. सुर्यकुमारने २७० चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह शतकी खेळी केली. फिरकी गोलंदाज कर्ण शर्माने (५/८१) मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातली.यानंतर, फलंदाजीला उतरलेल्या रेल्वेला रोखण्यात मुंबईकरांना यश आले. युवा विजय गोहिलच्या (२/२५) अचूकतेपुढे रेल्वेचे फलंदाज दडपणाखाली आले. त्याने सलामीवीर सौरभ वाकासकर (१५) आणि आशिष सिंग (२२) असे दोन महत्त्वाचे बळी घेत रेल्वेच्या धावसंख्येला ब्रेक दिला. तुषार देशपांडेने सलामीवीर शिवकांत शुक्लाच्या (१३) रुपाने एक बळी घेतला. दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा रेल्वेने ४५ षटकात ३ बाद ७६ धावांची मजल मारली होती. यष्टीरक्षक नितीन भिल्ले (१५*) खेळत असून अरिंदम घोष (६*) त्याला साथ देत आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक मुंबई (पहिला डाव) : १३३.२ षटकांत सर्वबाद ३४५ धावा (सुर्यकुमार यादव ११०, अखिल हेरवाडकर ९६, श्रेयश अय्यर ७०; कर्ण शर्मा ५/८१, अमित मिश्रा २/६९)रेल्वे (पहिला डाव) : ४५ षटकात ३ बाद ७६ धावा (आशिष सिंग २२, नितिन भिल्ले खेळत आहे १५, अरिंदम घोष खेळत आहे ६; विजय गोहिल २/२५.)
मुंबईची रेल्वेविरुद्ध दमदार पकड
By admin | Published: November 07, 2016 5:46 AM