कोलंबो : भारताला पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला असला तरी उर्वरित दोन कसोटी सामन्यांत संघाच्या खेळण्याच्या शैलीमध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली. संघ दडपणाखाली आला म्हणून भारताने सामना गमावला. एका सामन्यात विजय मिळविला म्हणजे संघाला पुन्हा लय प्राप्त होईल, असेही शास्त्री म्हणाले. गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत सामन्याचे चित्र अचानक बदलले आणि भारताला ६३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पत्रकारांसोबत बोलताना शास्त्री म्हणाले,‘आम्ही खेळाच्या शैलीमध्ये कुठलाच बदल करणार नाही. आम्ही पहिल्या सामन्यादरम्यान वापरलेली रणनीती कायम राखू. आम्ही पहिल्या लढतीत एक चूक केली. अनुकूल निकाल मिळविण्यासाठी अखेरपर्यंत लढत देणे आवश्यक असते.’संघावर दडपण आहे का, याबाबत बोलताना शास्त्री यांनी नकारात्मक उत्तर दिले. शास्त्री म्हणाले,‘दडपणाचा प्रश्नच उद््भवत नाही. खेळपट्टीचे स्वरूप बदलू शकते, असा विचार करीत संघाने दडपण स्वीकारले. एक विजय मिळविल्यानंतर ती अनेक विजयांची सुरुवात ठरणार आहे. ’१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव ४९.५ षटकांत ११२ धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ अनेकदा तीन फिरकीपटूंसह खेळतो. अश्विनने या लढतीत चांगली कामगिरी केली, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. भारताने पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी घेतली होती, पण चुकीमुळे भारताला सामना गमवावा लागला. त्यामुळे कोहली व शिखर धवन यांची शतके आणि आश्विनची १० बळी घेण्याची कामगिरी अखेर व्यर्थच ठरली. (वृत्तसंस्था)
खेळण्याची शैली बदलणार नाही
By admin | Published: August 17, 2015 10:53 PM