अनिल जावरे, अक्कलकुवातालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील बर्डी येथील सामान्य आदिवासी कुटुंबातील किसन नरसी तडवी याने दोहा येथील आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावल्याचे वृत्त कळताच येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या तरुणाने सातपुड्यातील आदिवासींसह इतर तरुणांमध्ये एक आदर्श निर्माण केल्याची भावना येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले बर्डी हे गाव पाड्यापाड्यांनी बनले असून, तेथील लोकसंख्या सुमारे एक हजारावर आहे. या गावातील नरसी रेड्या तडवी व गेनाबाई या सर्वसाधारण अशिक्षित दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेल्या किसनचे प्राथमिक शिक्षण गावातीलच शासकीय आश्रमशाळेत झाले.सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात गरिबीमध्ये जन्मलेल्या किसनला लहानपणी आई-वडील घरच्या शेळ्या चारण्यासाठी पाठवीत. दऱ्याखोऱ्यांमध्ये शेळ्या चारता-चारता त्याच्या अंगी सातपुड्यात धावण्याची कला आत्मसात झाली व तो न थकता सुसाट वेगाने कधी धावू लागला, हे त्यालादेखील कळाले नाही. पुढे किसनचे मोठे बंधू अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी किसनला नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये भरती करण्याचे ठरविले. या वेळी येथील शाळेत घेण्यात आलेल्या शारीरिक व बौद्धिक चाचणीत त्याने दाखविलेली चुणूक पाहून तेथील प्रशिक्षक विजेंदरसिंग (हरियाना) यांनी त्याच्या धावण्याच्या अद्भुत शक्तीला ओळखले व त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ८०० मीटर, नंतर एक हजार ५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत किसनने यश मिळविले. त्यानंतर त्याने नुकत्याच दोहा येथे झालेल्या स्पोर्ट क्लब स्टेडियमवरील पहिल्या आशियाई स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवून सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातही जागतिक पातळीवरचे खेळाडू असल्याचे आपल्या क्षमतेतून दाखवून दिले आहे.
किसनच्या यशाने बर्डीपाडा भारावले
By admin | Published: May 12, 2015 12:26 AM