कर्णधाराचे शतक : मुंबईचा पहिल्या दिवशी धावांचा डोंगरमुंबई : मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या झंझावाती शतकामुळे वानखेडे स्टेडियमवर सोमवारी ‘सूर्य’मय लखलखाट झाला. रणजी करंडक स्पर्धेतील मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीत मुंबईने पहिल्या दिवशी वर्चस्व राखत ४ बाद ३७५ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर अखिल हेरवाडकर यानेही ९७ धावांचा झंझावाती खेळ करून हा डोंगर उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. सिद्धेश लाड (६९) आणि सर्फराज खान (२०) दिवसअखेर खेळत होते. नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशने यजमानांना फलंदाजीचे आमंत्रण दिले. गेल्या चार सामन्यांत अपयशी ठरलेल्या मुंबईच्या सलामीवीरांनी मध्य प्रदेशविरुद्ध दमदार खेळ केला. आदित्य तरे आणि अखिल हेरवाडकर यांनी ९३ धावांची सलामी दिली. ईश्वर पांडे याच्या अनुपस्थितीत मध्य प्रदेशची गोलंदाजी आधीच खिळखिळीत झाली होती आणि त्यात तरे व हेरवाडकरने त्यांचे खच्चीकरण केले. या दोघांनी जवळपास २८ षटके खेळून काढली. पुनित दाते याने मध्य प्रदेशला पहिले यश मिळवून दिले. त्याने तरेला ३७ धावांत माघारी धाडले. बंगालविरुद्धच्या लढतीत दीडशतकी खेळी करणारा श्रेयस अय्यर या लढतीत अपयशी ठरला. त्याला दातेने झेलबाद करून माघारी धाडले. त्या वेळी २ बाद ९९ धावा अशा अवस्थेत असलेल्या मुंबईच्या मदतीला कर्णधार सूर्यकुमार यादव धावून आला. यादवने हेरवाडकरसह तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची विक्रमी भागीदारी करून मुंबईला दोनशेचा पल्ला पार करून दिला. शतकाच्या उंबरठ्यावर आलेल्या हेरवाडकरला अंकित शर्माने नमन ओझाकरवी यष्टीचीत केले. हेरवाडकर १५१ चेंडूंत १५ चौकार व १ षटकार खेचून ९७ धावांवर माघारी परतला. या विकेटनंतर यादवने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि त्याने सिद्धेश लाडसह चौथ्या विकेटसाठी १३० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांनी मध्य प्रदेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यांनी ३० षटके खेळून काढली आणि संघाला तिनशेचा पल्ला पार करून दिला. (क्रीडा प्रतिनिधी)104धावांची भागीदारी अखिल हेरवाडकर आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी केली. या जोडीने १९.१ षटकांत ५.४२च्या सरासरीने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांची धुलाई केली.130धावा सूर्यकुमार आणि सिद्धेश लाड या जोडीने चौथ्या विकेटसाठी चोपल्या. त्यांनी थोडासा संयमी खेळ केला. त्यांनी २९.५ षटकांत ४.३५च्या सरासरीने धावा केल्या.08गोलंदाजांना मुंबईची धावगती रोखण्यासाठी मध्य प्रदेशचा कर्णधार देवेंद्र बुंदेला याने पाचारण केले. त्याचा काहीच फायदा धावगतीवर झाला नाही. यादवने याच दरम्यान आपले शतक पूर्ण केले. त्याने १४५ चेंडूंत २२ चौकार व १ षटकार खेचून १३५ धावा कुटल्या. हरप्रीत सिंग याने त्याला त्रिफळाचीत केले. या विकेटनंतर मुंबईने सावध खेळ केला आणि दिवसअखेर ४ बाद ३७५ धावांचा डोंगर उभा केला. लाड ११८ चेंडूंत ११ चौकारांसह ६९ धावांवर, तर खान २० धावांवर खेळत आहे. संक्षिप्त धावफलक : मुंबई : तरे झे. हरप्रीत गो. दाते ३७, हेरवाडकर यष्टीचीत ओझा गो. अंकित शर्मा ९७, अय्यर झे. मिश्रा गो. दाते ४, यादव त्रि. गो. हरप्रीत सिंग १३५, लाड नाबाद ६९, खान नाबाद २०. अवांतर - १३; एकूण - ८७ षटकांत ४ बाद ३७५ धावा. गोलंदाजी - दाते १८-२-६२-२, रावत १६-४-६०-०, आवेश खान १६-१-७१-०, मिश्रा ८-०-६२-०, शर्मा १२-२-४१-१, सक्सेना ५-०-३२-०, रमीज खान ४-०-२१-०, हरप्रीत ८-१-२१-१.
‘सूर्य’मय लखलखाट
By admin | Published: January 06, 2015 1:45 AM