मुंबई : आपल्या खेळीवर समाधानी होण्याऐवजी धावांची भूक वाढवून आपल्या कामगिरीत सातत्य कसे राखता येईल, याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे, असा सल्ला भारताचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी युवा क्रिकेटपटूंना दिला.सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये स्पर्धा अधिक वाढली असून अशा परिस्थितीमध्ये केवळ शतक झळकावून चालणार नाही. खेळाडूंनी मोठी धावसंख्या उभारण्याचे लक्ष ठेवून खेळावे. असे केल्याने आपोआप तुम्ही निवडकर्त्यांच्या नजरेत येता, असेही गावसकर यांनी सांगितले. गावसकर यांनी मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनाही खेळाडूंना हाच सल्ला देण्याबाबत सांगितले. याबाबतीत गावसकर म्हणाले, ‘मी पंडित यांनाही खेळाडूंना केवळ शतकी खेळावर समाधानी न होण्यास सांगितले. अश्याने संघाची कामगिरी सुधारेल आणि देशाकडून खेळण्याच्या अशाही वाढतील. आज अनेक स्पर्धा एकाचवेळी सुरु असतात. अशावेळी कित्येक खेळाडू शतक झळकावतात. मात्र, तुम्ही याचवेळी दुहेरी किंवा तिहेरी शतक झळकावले तर निश्चित निवडकर्तेही तुमच्याकडे लक्ष देतील.’ (वृत्तसंस्था)
युवा खेळाडूंनी धावांची भूक वाढवावी सुनिल गावसकर
By admin | Published: March 11, 2016 11:32 PM