ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - डीआरएस वाद प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथविरोधात कारवाई न केल्याने भारताचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) सडकून टीका केली आहे. 'काही देशांना झुकतं माप दिलं जात आणि काही देशांना दिलं जात नाही. उदाहरणार्थ उद्या जर भारतीय खेळाडून असं काही केलं तर मग त्याच्यावरही कारवाई केली नाही गेली पाहिजे', असं सुनील गावसकर बोलले आहेत.
'विराट कोहलीला आऊट दिल्यानंतर तो रिव्ह्यूसाठी ड्रेसिंग रुमकडे पाहत असेल आणि त्याला तेथून काही उत्तर मिळावं असं होताना पाहायला मला आवडेल. त्यानंतर अम्पायर आणि आयसीसी काय निर्णय घेतात ते मला पाहायचं आहे', असं सांगत सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बंगळुरुत झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात पायचीत झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने रिव्ह्यू घेण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे पाहिल्याने वाद सुरु झाला होता. यानंतर स्टीव्ह स्मिथने डीआरएसच्या निर्णयावर रेफरल मागण्याआधी ड्रेसिंग रूमकडे आपण चुकून पाहिल्याचं सांगितलं आहे. तसंच ती आपली घोडचूक असल्याचंही कबूल केलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळण्यात आलेल्या टेस्ट सीरिजमधला डीआरएस वाद चांगलाच चिघळला चालला असून वाद शमण्याची काही चिन्हे दिसत नाही आहेत. या प्रकरणात आता दोन्ही देशातील क्रिकेट दिग्गजांनीही उडी घेण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने स्टीव्ह स्मिथ एक प्रतिष्ठित खेळाडू असून त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे असं म्हटलं आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) कर्णधार विराट कोहलीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने डीआरएसच्या निर्णयावर रेफरल मागण्याआधी ड्रेसिंग रूमकडे पाहून संकेत स्वीकारले ही त्याची चूक होती की काय, याची शहानिशा करण्यासाठी चौकशी नियुक्त करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथवरील खोटारडेपणाचे आरोप फेटाळल्यानंतर बीसीसीआयने कोहलीच्या समर्थनार्थ वादात उडी घेतली आहे. बीसीसीआयच्या मते, या सर्व प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर टीम इंडिया आणि कर्णधार कोहली यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. विराट परिपक्व आणि अनुभवी खेळाडू आहे. मैदानावर त्याची वागणूक फारच आक्रमक असते. आयसीसी एलिट पंच नायजेल लोंग यांनीदेखील मैदानावरील कोहलीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांनीच स्टीव्ह स्मिथ याला ड्रेसिंग रूमकडून इशारा घेण्यापासून रोखले.’ आयसीसीने या प्रकरणाचा तपास करावा आणि दोषींवर कारवाई करावी, असे बीसीसीआयला वाटते. उर्वरित दोन्ही कसोटी सामने खेळ भावनेने खेळले जातील, अशी अपेक्षादेखील व्यक्त केली.
स्टीव्ह स्मिथने पत्रकारांसोबत बोलताना ती माझी घोडचूक होती, असे कबूल केले आहे. आयसीसीने या प्रकरणाची शहानिशा करायला हवी. पुढील दोन सामने खेळभावनेने खेळू, अशी ग्वाहीदेखील स्मिथने दिल्याचे बीसीसीआयने वक्तव्यात नमूद केले.