चेन्नई : फिरकीपटू सुनील नारायणला आयपीएलच्या आठव्या पर्वांत गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करण्यास परवानगी मिळाली आहे. बीसीसीआयच्या समीक्षा समितीने वेस्ट इंडिजच्या या गोलंदाजाला रविवारी ‘क्लीन चिट’ दिल्यामुळे त्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत केकेआरच्या एक लढतीदरम्यान नारायणच्या गोलंदाजी शैलीबाबत तक्रार करण्यात आली होती. बीसीसीआयच्या समीक्षा समितीमध्ये एस. व्यंकटराघवन, जवागल श्रीनाथ आणि ए.व्ही. जयप्रकाश यांचा समावेश आहे. त्यांनी नारायणच्या गोलंदाजी शैलीची तपासणी केली. श्रीरामचंद्र विद्यापीठात श्रीनाथ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नारायणच्या गोलंदाजी शैलीच्या अनेक चाचण्या घेतल्या. बीसीसीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले की, चाचणी अहवालामध्ये समितीने म्हटले आहे की, गोलंदाजी शैलीमध्ये सुधारणा करणारा नारायण आयसीसीने ठरवलेल्या नियमानुसार गोलंदाजी करीत असून संशयीत गोलंदाजी शैली असलेल्या गोलंदाजांच्या यादीमधून त्याचे नाव वगळण्यात यावे. नारायण आता बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी निवडीसाठी उपलब्ध राहील. (वृत्तसंस्था)
सुनील नारायणला ‘क्लीन चिट’
By admin | Published: April 06, 2015 3:07 AM