हैदराबाद : सलग दोन विजय मिळविणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा आत्मविश्वास उंचावला असून, आयपीएलच्या आठव्या पर्वात आज, सोमवारी त्यांना किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सनरायझर्स संघ या लढतीत प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याचा दावा पक्का करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. सुरुवातीला सूर गवसण्यासाठी संघर्ष करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यामुळे या संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी रायपूरमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ६ धावांनी पराभव केला. मधल्या फळीचे अपयश सनरायझर्स संघासाठी चिंतेची बाब ठरली होती, पण गेल्या काही सामन्यांमध्ये मोइजेस हेन्रिक्स, इयोन मॉर्गन व नमन ओझा यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. लेगस्पिनर कर्ण शर्माने फलंदाजीमध्येही छाप सोडली आहे. हेन्रिक्सने दिल्लीविरुद्ध ४६ चेंडूंमध्ये नाबाद ७४ धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये डेल स्टेन, ट्रेन्ट बोल्ट, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा व कर्ण शर्मा यांच्यात चमकदार कामगिरी करण्याची क्षमता आहे. गृहमैदानावर हैदराबाद संघाचा आत्मविश्वास अधिक उंचावण्यास मदत मिळेल. याच मैदानावर २ मे रोजी गेल्या लढतीत हैदराबाद संघाने चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केला होता. दुसऱ्या बाजूचा विचार करता गतउपविजेत्या पंजाब संघाने या स्पर्धेत केवळ दोनदा विजयाची चव चाखली असून, हा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहे. ग्लेन मॅक्सवेल व मिशेल जॉन्सन या स्टार खेळाडूंना या स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुरली विजय, मनन व्होरा, वृद्धिमान साहा, मॅक्सवेल व डेव्हिड मिलर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या किंग्स इलेव्हनला या स्पर्धेत सांघिक कामगिरी करण्यात अपयश आले. हैदराबाद संघाच्या दिग्गज गोलंदाजांविरुद्ध पंजाब संघाच्या फलंदाजांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. उभय संघांदरम्यान यापूर्वी पाच सामने खेळले गेले असून, त्यापैकी तीन सामन्यांत हैदराबाद संघाने विजय मिळविला आहे. प्रतिस्पर्धी संघकिंग्स इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार), अक्षर पटेल, अनुरित सिंग, बुरान हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, गुरकिरत सिंग मान, करणवीर सिंग, मनन व्होरा, मिशेल जॉन्सन, परविंदर अवाना, ऋषी धवन, संदीप शर्मा, शार्दुल ठाकूर, शॉन मार्श, शिवम शर्मा, थिसारा परेरा, वीरेंद्र सेहवाग, रिद्धिमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक, योगेश गोलवलकर.सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, नमन ओझा, केन विलियम्सन, डेल स्टेन, मोइजेस हेन्रिक्स, इयोन मोर्गन, रवी बोपारा, ट्रेंट बोल्ट, परवेज रसूल, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, आशिष रेड्डी, रिकी भुई, चामा मिलिंद, प्रवीण कुमार, हनुमा विहारी, प्रशंत पद्मनाभन, सिद्धार्थ कौल, बिपुल शर्मा.
सनरायझर्स-किंग्स इलेव्हन लढत आज
By admin | Published: May 11, 2015 2:49 AM