ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 12 - भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 250 बळी टिपण्याचा विक्रमावर आपले नाव कोरले आहे. याआधी झटपट 200 बळी पूर्ण करणाऱ्या अश्विनने केवळ 45 कसोटीमध्येच 250 बळींचा टप्पा ओलांडत डेनिस लिलींचा विक्रम मोडीत काढला. लिलींनी 48 कसोटीत 250 बळी टिपले होते.
बांगलादेशविरुद्ध हैदराबाद येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटीच्या चौथ्या दिवशी आज अश्विनने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहिमची विकेट काढत कसोटी कारकीर्दीतील 250 बळींचा टप्पा ओलांडला. अश्विनने 250 बळी मिळवण्यासाठी केवळ 45 खेळले. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 250 बळी टिपण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्या नावावर होता. लिलींनी 48 कसोटीत 250 बळी टिपले होते. तर भारताकडून अनिल कुंबळेने 55 कसोटीत 250 बळी टिपले होते.
डेनिस लिली (48 कसोटी), डेल स्टेन (49 कसोटी), अॅलन डोनाल्ड (50 कसोटी) मुथय्या मुरलीधरन (51 कसोटी), वकार युनिस (51 कसोटी), रिचर्ड हेडली (53 कसोटी), माल्कम मार्शल (53 कसोटी) आणि अनिल कुंबळे (55 कसोटी), इम्रान खान (55 कसोटी) या दिग्गजांना पछाडत अश्विनने हा विक्रम आपल्या नावे केला.