बरोबर १६ वर्षांपूर्वी तू पहिले जागतिक जेतेपद जिंकलेलेस आणि आज वयाच्या ३५ व्या वर्षी त्याचे षष्टक पूर्ण केलेस. सहा जागतिक जेतेपदं जिंकणारे तू पहिलीच आणि कदाचित यापुढे अनेक वर्ष हा पराक्रम तुझ्याच नावावर असणार आहेस. भारतात असे लाखो- कोट्यवधी पप्पा असतील की ज्यांनी केवळ तुझ्यामुळेच त्यांच्या लाडक्या मुलीच्या हाता बाहुली न देता बॉक्सिंग ग्लोज दिले.. मुलींनी अबला न राहता दुर्गा बनावं हा त्यामागच हेतू...आणि हे परिवर्तन तू घडवलेस. तुझ्यासारखी तू एकमेवाद्वितीय. मेरी कोम...
स्वप्नांना मुरड घालून संसारात अडकलेल्या त्या प्रत्येक गृहिणीची तू आदर्श आहेस. तुही गृहिणी, परंतु त्याचे दडपण न घेता तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग केलास आणि ती पुर्णही केलीस. अर्थात ओनरेल सारखा पती मिळाला ही तुझी पुण्याईच.. त्याने केलेले सर्व त्याग हे तुला स्वप्नांचा पाठलाग करताना नेहमी बळ देत राहिले.. म्हणूनच तू ही अनन्यसाधारण कामगिरी करू शकलीस. पदरी तीन मुलांची जबाबदारी असतानाही तू बॉक्सिंग रिंगमध्ये बिनधास्त उतरू शकलीस ते ओनरेलमुळे. तुझ्या चित्रपटात अनेक गोष्टी दाखवल्या, परंतु आपल्या मुलांना कुशीत घेण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी तुझ्यातल्या आईची तडफड त्यात दिसली नाही. आपल्या पिलांपासून दूर राहण्याचे दु:ख एक आईच जाणू शकते आणि त्यावर मात करून यश मिळवणे किती अवघड हे तुझे तुच जाणे.२००२ ते २०१८ ( मधली काही वर्ष वगळली) या कालावधीत तू भारतातील असंख्य तरुणींना जगण्याची हिम्मत दिलीस, आजही देतेस आणि येणारी पिढीही तुझ्याकडून प्रेरणा घेतच राहतील... महिलांना सशक्त करण्यासाठी तू वाढवलेला वटवृक्ष वाढतच राहणार आहे... आज त्या वटवृक्षाला तू जागतिक पदकाने पुन्हा खत घातलेस.. २०१६ मध्ये मेरी कॉमयुग संपले असे वाटले होते, पण राष्ट्रकुल आणि आज जागतिक पदकाने पुन्हा सुपर मॉम दिसली. तुझ्या तीन मुलांना, पती ओनरेल याला आणि तुला Hat's off