ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 1 - आयपीएलच्या यंदाच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या बेन स्टोक्सने आज आपले मूल्य सिद्ध केले. आघाडीचे चार फलंदाज माघारी परतल्यावर स्टोक्सने केलेल्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर अटीतटीच्या लढतीत पुण्याने आयपीएलमध्ये आज झालेल्या दुसऱ्या लढतीत गुजरात लायन्सवर पाच गडी राखून मात केली. या विजयासह पुण्याचा संघ गुणतालिकेत चौथे स्थान कायम राखले आहे.
विजयासाठी मिळालेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याची सुरुवात चांगली झाली नाही. अजिंक्य रहाणे (4), स्टीव्हन स्मिथ (4), मनोज तिवारी (0) आणि राहुल त्रिपाठी (6) हे झटपट बाद झाल्याने पुण्याचा डाव 4 बाद 42 असा अडचणीत सापडला.
पण आजचा सामना गाजवणाऱ्या स्टोक्सने धोनीच्या (26) साथीने पाचव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करत पुण्याला सामन्यात पुनरागमन करून दिले. 63 चेंडूत सात चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 103 धावा कुटणाऱ्या स्टोक्सने अखेर डॅन ख्रिस्टियानच्या साथीने पुण्याला शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी पुण्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर स्फोटक सुरुवात करणाऱ्या गुजरात लायन्सला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. इशान किशन (31) आणि ब्रेंडन मॅक्युलम (45) हे बाद झाल्यानंतर गुजरातचा डाव गडगडला. इम्रान ताहीर आणि जयदेव उनाडकट यांच्या भेदक गोलंदाजीसमोर गुजरातचा डाव 161 धावांवरच आटोपला. पहिल्या 10 षटकात 94 धावा कुटणाऱ्या गुजरातला पुढच्या दहा षटकांत केवळ 67 धावाज जमवता आल्या. पुण्याकडून ताहीर आणि उनाडकटने प्रत्येकी तीन बळी टिपले.