ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विष्णूच्या रूपात दाखवल्याच्या एका प्रकरणात धोनीविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. धोनी भारतीय संघाच्या कर्णधारपदी असताना त्याची ब्रँड व्हॅल्यू अधोरेखित करण्यासाठी एका मासिकाने त्याला भगवान विष्णूच्या रूपात दाखवले होते. त्यात दोनीच्या हातात विविध कंपन्यांचे प्रॉडक्ट दाखवण्यात आले होते.
निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात संबंधित मासिकाच्या संपादकावरही धार्मिक भावना भडकावल्याचा खटला चालू शकत नसल्याचे सांगत संबंधित याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती दीपक मिश्रा, ए. एम. खानविलकर आणि एम.एम.शांतानागोदर यांनी आज हा निर्णय दिला. तसेच धोनीवर याप्रकरणी याचिका चालवल्यास तो न्यायाचा उपहास ठरेल, कारण त्याने कुणाच्याही भावना दुखावण्याच्या हेतूने हे कृत्य केले नव्हते, अशी टिप्पणी न्यायमूर्तींनी केली. भारतीय दंड विधान 295 अ अनुसार या प्रकरणात आरोप दाखल होऊ शकत नाही असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
या प्रकरणी धोनी आणि अन्य व्यक्तींविरोधात आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गतवर्षी 5 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकणातील सर्व आरोपींविरोधात बंगळुरूतील कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेली धार्मिक भावना दुखावल्याची याचिका रद्द ठरवली होती.
या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका रद्द करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करून या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.