ब्युनास आयर्स : डेहराडूनचा निवासी असलेला अॅथलिट सूरज पनवार याने येथे सुरू असलेल्या युवा आॅलिम्पिकमध्ये मंगळवारी पाच हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य जिंकले. सूरज ने ‘वॉक रेस’ प्रकारात भारताचा तिरंगा फडकवला.
डेहराडूनच्या प्रेमनगरनजीकच्या एका गावात राहणाऱ्या १७ वर्षांच्या सूरजने सोमवारी पहिल्या टप्प्यात २० मिनिटे २३.३० सेकंद आणि मंगळवारी २० मिनिटे ३५.८७ सेकंद असे एकूण ४० मिनिटे ५९.१७ सेकंद वेळेसह दुसरे स्थान घेतले. पहिल्या टप्प्यात अव्वल स्थानावर राहीलेल्या इक्वाडोरच्या आॅस्कर याने २० मिनिटे १३.६९ सेकंद वेळ नोंदविली होती. दुसºया टप्प्यात त्याने २० मिनिटे ३८.१७ सेकंद वेळ नोंदवित दुसरे स्थान मिळविले. आॅस्करची एकूण वेळ ४० मिनिटे ५१.८६ सेकंद झाल्याने तो सुवर्णाचा मानकरी ठरला.
यंदा युवा आॅलिम्पिकच्या अॅथलेटिक्स प्रकारात भारताचे हे पहिले पदक ठरले. याआधी २०१०च्या युवा आॅलिम्पिकमध्ये अर्जुनने थाळीफेकीत आणि दुर्गेश कुमारने ४०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते.
पदक जिंकणे सुखद अनुभव आहे. हा आनंद अनुभवण्यासाठी मी फार कठोर मेहनत घेतली आहे, देशासाठी हे माझे पहिलेच पदक आहे, वेळेत सुधारणा करण्यासह सिनियर गटात पदक जिंकणे हे आपले पुढील लक्ष्य असेल.- सूरज पनवार, युथ आॅलिम्पिक रौप्य विजेता