चेन्नई : राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेल्या सुरेश कलमाडी यांना मंगळवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) वार्षिक आमसभेमध्ये आजीवन अध्यक्ष बनविण्यात आले. आरोपांमुळे चर्चेत राहिलेले अन्य एक पदाधिकारी अभय सिंग चौटाला यांचीही आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आयओएच्या अधिकृत वेबसाईटनुसार कलमाडी व चौटाला यांच्यापूर्वी केवळ विजय कुमार मल्होत्रा यांना आयओएचे आजीवन अध्यक्ष बनविण्यात आले होते. ते २०११ आणि २०१२ मध्ये आयओएचे कार्यकारी अध्यक्षही होते. कलमाडी १९९६ ते २०११ पर्यंत आयओएच्या अध्यक्षपदी होते. त्यांना २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारामध्ये समावेश असल्याच्या आरोपाखाली १० महिने तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. पुणे येथे जन्मलेले ७२ वर्षीय कलमाडी काँग्रेसचे माजी खासदार आहेत. ते २००० ते २०१३ या कालावाधीत आशियाई अॅथ्लेटिक्स महासंघाचे अध्यक्षही होते. त्यांची गेल्या वर्षी आशियाई अॅथ्लेटिक्स महासंघाच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते आंतरराष्ट्रीय अॅथ्लेटिक्स महासंघाचे २००१ ते २०१३ या कालावधीत सदस्य होते. चौटाला डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत आयओएचे अध्यक्ष होते. त्या कालावधीत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने निवडणुकीमध्ये आयओएला निलंबित केले होते. आरोपपत्र असलेल्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये उतरविल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. आयओएचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या निवडीला आयओसीने रद्द केले होते. आयओएने घटनेमध्ये बदल करताना आरोप पत्र दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आयओसीने फेब्रवारी २०१४ मध्ये आयओएवरील निलंबन रद्द केले. चौटाला यांची बॉक्सिंगची यापूर्वीची संघटना भारतीय अम्यॅच्युर बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर एआयबीएने (जागतिक बॉक्सिंग महासंघ) २०१३ मध्ये या संघटनेची मान्यता रद्द केली. अलीकडेच चौटाला यांची हरियाणा आॅलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या गटाला आयओएने मान्यता प्रदान केली आहे. (वृत्तसंस्था)क्रीडामंत्री गोयल : निवड स्वीकारार्ह नाही- सुरेश कलमाडी व अभय सिंग चौटाला यांची भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या निर्णयावर केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करताना गोयल यांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले. - आपल्या निवास्थानी घाईघाईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत गोयल यांनी सांगितले की, ‘कलमाडी व चौटाला यांची आयओएच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले. दोघेही भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सामोरे जात आहेत. याचा अहवाल मागण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल. ’
सुरेश कलमाडी, चौटाला यांचे ‘पुनर्वसन’
By admin | Published: December 28, 2016 3:06 AM