Tokyo Olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया यानं ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून त्याला ७-४ असा पराभव पत्करावा लागला. रवी कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पाचवे पदक आहे. २३ वर्षीय रवीनं ऑलिम्पिक पदार्पणात पदक जिंकून सर्वांची मनं जिंकली.
उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यानं ज्या पद्धतीनं कमबॅक केलं ते पाहून सर्वच अवाक् झाले होते. त्यानं कोलंबियाचा ऑस्कर टिग्रेरोस, बल्गेरियाच्या जॉर्जी व्हॅनगेलोव्ह व कझाकिस्तानच्या नुरीस्लॅम सानायेव्ह यांचा पराभव केला. उपांत्य फेरीत २-९ अशा पिछाडीवरून कमबॅक करताना बाजी मारली. त्यानं सुवर्णपदकाच्या सामन्यात दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनलाही कडवी टक्कर दिली.
दहियाचा अंतिम फेरीचा सामना दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार तिहार जेलमधून पाहत होता. इंडिया टूडेनं दिलेल्या वृत्तानुसार रवी कुमार दहियाची लढत पाहताना सुशील इमोशनल झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुशीलनं २०१२च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य जिंकले होते आणि रवी कुमारनं या विक्रमाशी बरोबरी केली. तत्पूर्वी सुशीलनं २००८मध्ये कांस्यपदक जिंकले होते. ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सुशील जेलमध्ये आहे.