- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
गेल्या आठवड्यात मल्ल सुशील कुमारला हत्येच्या आरोपात झालेली अटक कुठल्याही क्रीडा इतिहासातील नाट्यमय घडामोड ठरली. पोलिसांपासून जवळजवळ तीन आठवडे पळ काढणाऱ्या सुशीलला अखेर राजधानी दिल्लीत अटक करण्यात आली. हातात बेड्या असलेले त्याचे छायाचित्र त्याच्या प्रतिमेला धक्का पोहचविणारे ठरले.मितभाषी सुशील दोनदा ऑलिम्पिक पदकांचा (बीजिंग २००८मध्ये कांस्य आणि लंडन२०१२मध्ये रौप्य) मानकरी होता. सुशीलची जगात ख्याती होती. तो भारतातील युवा मल्लांचा प्रेरणास्रोत होता. दोन दशके त्याने कुस्तीमध्ये वर्चस्व गाजवले आणि त्याची ही प्रतिमा महिनाभरापेक्षा कमी कालावधीत मलिन झाली. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाले तर त्याची आणखी बदनामी होईल.उत्तर भारतातील कुस्तीचे प्रमुख केंद्र असलेल्या छत्रसाल आखाड्यातील ज्युनियर मल्ल २३ वर्षीय सागरच्या हत्येचा त्याच्यावर आरोप आहे. सुशील कुमारच्या कल्पनेतूनच हे कुस्ती संकुल साकारण्यात आले होते. त्याने त्याचा वैयक्तिक लाभासाठी वापर केला.चुकीचे पाऊल पडलेला सुशील काही पहिला दिगगज क्रीडापटू नाही. १९९४ मध्ये अमेरिकन फुटबॉल दिग्गज ओ.जे. सिम्पसनवर पत्नी निकोल ब्राऊन सिम्पसनची हत्या केल्याचा आरोप होता. नाट्यमय पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ व वादग्रस्त ठरलेली ही घटना होती. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पॅरालिम्पिक चॅम्पियन ब्लेड रनर ऑस्कर प्रिस्टोरियसला त्याची मैत्रीण रीवा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी तुरुंगात डांबण्यात आले होते. या प्रकरणात प्रिस्टोरियस अद्याप तुरुंगातच आहे.व्यासपीठावर तिरंगा फडकलेला बघण्याच्या भावनेशी कसलीच तुलना करता येणार नाही, असे सुशील लंडनमध्ये म्हणाला होता. सुशीलच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकला असता त्यात असंतोष दिसून येतो. त्याचे नरसिंग यादवसोबत बिनसल्याचा इतिहास आहे. बऱ्याच मल्लांनी अन्य आखाड्यांसाठी छत्रसाल सोडल्याची सत्यता, पात्रतेच्या लढती खेळण्यास नकार देणे सुशीलला मान्य नव्हते. तरी सुशीलकडे जीवनात कीर्ती, पैसा, मानसन्मान आदींचा खजिना होता. असा व्यक्ती क्रूरतेच्या कथित कृत्याकडे कसा काय वळतो ? असा प्रश्न पडतो. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मला मानवी स्वभावाबाबत विशेष कल्पना नाही, पण सुशील कुमारच्या कथित घटनेने आपल्याला नक्कीच आश्चर्यचकित केले, हे कबूल करावेच लागेल.ज्या व्यक्तीला मी दोनदा भेटलो त्या तुलनेत ही व्यक्ती एकदम वेगळी आहे. २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ६६ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावल्यानंतर तो केवळ भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या अभिमानाबाबत बोलला. सिम्पसन व प्रिस्टोरियस यांच्याप्रमाणे सुशील प्रकरणाला भावनिक नात्याचे बंध नाहीत. परंतु ‘पॉवर सिंड्रोम’ सिद्धांताचा वास येतो. त्यात काही लोकांवर व प्रियजनांसह पूर्ण नियंत्रण ठेवण्याची मानसिक इच्छा असते. अशा व्यक्तीच्या वर्तनामुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसतो.