नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी भारतीय कुस्तीमध्ये साक्षी मलिक आणि सुशीलकुमार यादव यांच्या कामगिरीवरच विशेष लक्ष राहिले. दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारच्या शानदार पुनरागमन केले खरे; मात्र कुस्ती या खेळाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित झाले. तीन वर्षांपूर्वी या दिग्गज पहलवानाने माघार घेतल्यानंतर हा खेळ अधिक पुढे जाऊ शकला नाही. बीजिंग आॅलिम्पिकपासून भारताला पदक मिळत आहेत. एकंदरित मात्र या खेळाचा दर्जा कायम राखण्यात अपयश आले.
ब-याच वेळी पदक जिंकल्यानंतर सुद्धा भारतीय पहलवान आशा पूर्ण करू शकले नाही. कुणीच सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांच्या कामगिरीपर्यंत पोहचू शकला नाही. त्याचवेळी, दुसरीकडे रिओ आॅलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिकच्या कामगिरीत सातत्य दिसले नाही. त्याऊलट अनुभवी सुशीलसाठी पुनरागमन करणे सोपे नव्हते, मात्र ३४ वर्षीय सुशीलकुमारने राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. त्याने सिद्ध केले की त्याचा खेळाचा स्तर अजूनही उंच आहे. ग्लास्गो येथे २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर सुशीलकडून पुनरागमनाच्या अपेक्षा नव्हत्या. २०१५ मध्ये तो दुखापतग्रस्त झाला होता. तो निवड चाचणीतही सहभागी होऊ शकला नव्हता. त्यानंतर मात्र स्थिती बदलली. भारतीय कुस्ती महासंघ आणि दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आॅलिम्पिकमध्ये सुशीलला सहभागी होण्यापासून वंचित केले होते. त्याच्यावर काही आरोपही लावण्यात आले होते. याशिवाय, प्रशासकीय जबाबदारी आणि राष्ट्रीय निरीक्षक रुपात त्याला ठेवण्यात आले. त्यानंतर मात्र सुशीलने गेल्या महिन्यात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. इंदूर येथील या स्पर्धेत तो मॅटवर उतरला. राष्ट्रीय निरीक्षकपदाचा त्याने राजीनामा दिला आणि खेळाडू म्हणून कायम करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचवेळी, मोक्याच्यावेळी सुशीलच्या प्रतिस्पर्ध्यांनी घेतलेल्या माघारीमुळे मोठा वादही उफाळला.
सुशीलच्या पुनरागमनाची कथा वादविवादांपासून दूर राहिली नाही. सुशीलच्या पाचपैकी तीन स्पर्धकांनी त्याच्या सन्मानार्थ त्याच्याविरुद्ध न उतरण्याचा निर्णय घेतला आणि सुवर्णपदक त्यांच्या झोळीत टाकले. त्यामुळे सुशीलला आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला प्रतीक्षा करावी लागली. नुकताच जोहान्सबर्ग येथे राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुशीलने सुवर्णपदक जिंकले आणि आपणच अजूनही भारतीय कुस्तीचा राजा असल्याचे सिद्ध केले. दुसरीकडे, मे महिन्यामध्ये भारताने दिल्लीतील आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम प्रदर्शन करीत एका सुवर्णपदकासह एकूण १० पदक जिंकले. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताने तीन गटांत पदक जिंकले. मात्र, प्रतिस्पर्ध्यांचा स्तर आणि इतिहास पाहता विश्वस्तरावर भारतासाठी हे यश तोकडेच आहे.