मियामी : युरोपियन फुटबॉल महासंघाचे (युईएफए) निलंबित अध्यक्ष मायकल प्लातिनी यांना खेळाच्या सर्वच कार्यक्रमांतून निलंबित करण्यात आले असले, तरी ते दुबईमध्ये झालेल्या पुरस्कार समारंभात आणि संमेलनामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.प्लातिनी यांच्यावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) आचारसंहिता समितीने २१ डिसेंबर रोजी आठ वर्षांची बंदी घातली. त्यांना फुटबॉलच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त फिफाचे अध्यक्ष सॅप ब्लॅटर यांनाही आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. पण, त्यानंतर सहा दिवसांनी २७ डिसेंबर रोजी प्लातिनी दुबईमध्ये आयोजित ‘ग्लोब सॉकर अॅवॉर्ड’ कार्यक्रमात सहभागी झाले. या पुरस्कार समारंभाचे आयोजन दुबई क्रीडा परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यात अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनल मेस्सी आणि इटलीचा आंद्रिया पिरलो सहभागी झाले होते.फ्रान्सच्या प्लातिनी यांनी या पुरस्कार समारंभात सहभागी होताना छायाचित्र काढून घेतले आणि कार्यक्रमात इटलीच्या मीडियाला त्यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली होती. फिफाच्या आचारसंहिता समितीने प्लातिनीबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, फिफाच्या आचारसंहिता समितीची इन्व्हेस्टिगेटिव्ह चेंबर नियमाचे उल्लंघन झाले का, याची चौकशी करणार आहे.
निलंबित मायकल प्लातिनी अडचणीत येण्याची शक्यता
By admin | Published: December 31, 2015 3:23 AM