दोहा : आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या स्वप्ना बर्मन हिला आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी महिला हेप्टॅथलॉनमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, पदकाचा प्रबळ दावेदार जिन्सन जॉन्सनने पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीच्या काही वेळ आधी दुखापतीमुळे माघार घेतली.२२ वर्षीय स्वप्नाने सात स्पर्धांमध्ये एकूण ५९९३ गुण मिळवले व ती उज्बेकिस्तानच्या एकटेरिना वोर्निना (६१९८ गुण) नंतर दुसऱ्या स्थानी राहिली. अन्य भारतीय पूर्णिमा हेम्बराम ५५२८ गुणांसह पाचव्या स्थानी राहिली. स्वप्नाने गेल्या वेळी ५९४२ गुण घेत सुवर्ण पटकावले होते. तिने जकार्तामध्ये आशियाई खेळात ६०२६ गुण मिळवले होते. या रौप्य पदकानंतर भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदक मिळवले. महिलांच्या ३ हजार मीटर स्टिपल चेसमध्ये पारुल चौधरीने १० मिनिट ३.४३ सेकंदाची सर्वोत्तम वेळ नोंदवली. ती पाचव्या स्थानावर होती.पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत राऊंड एक हीटमध्ये काही वेळ आधी जॉन्सनने माघारीचा निर्णय घेतला. उपमुख्य प्रशिक्षक राधाकृष्णनन नायरने सांगितले की,‘जॉन्सन मांस पेशींच्या दुखापतीमुळे हैराण आहे. तपासणीनंतर त्याला ट्रॅकवर न उतरण्याचा सल्ला देण्यात आला.’ जॉन्सन याने सोमवारी ८०० मीटर फायनल्समध्ये आपला सहभाग नोंदवला नाही. त्याच्या नावावर ८०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम आहे. (वृत्तसंस्था)
स्वप्ना बर्मनचे चंदेरी यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 2:59 AM