म्हापसा : पश्चिम बंगाल येथील १५ वर्षीय अल्पवयीन जलतरणपटूचा विनयभंग केल्याप्रकरणी जलतरण प्रशिक्षक सुरजीत गांगुलीला पोलिसांनी दिल्लीतील काश्मिरा गेट परिसरात शुक्रवारी अटक केली. त्याच्या विरोधात उत्तर गोव्यातील म्हापसा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविला आहे. पीडितेच्या वडिलांनी ही तक्रार पश्चिम बंगाल पोलिसांकडे केली होती. मात्र, संबंधितांनी हा गुन्हा नोंदवून न घेता थेट गोवा पोलिसांना पाठवून दिला. त्यानंतर उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना ई-मेलद्वारे ही तक्रार आली होती. म्हापसा पोलिसांनी संशयित प्रशिक्षक गांगुलीविरुद्ध भादंसंच्या कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (विनयभंग) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) तसेच गोवा बाल कायदा व पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविला होता. गांगुलीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार केली होती. यातील एक दिल्ली, दुसरे भोपाळ तर तिसरी बंगळुरू येथे पाठविले होते. विनयभंगाचा हा प्रकार १४ मार्च ते २८ ऑगस्ट २०१९ दरम्यान घडला असावा. या कालावधीतच पीडितेने हा व्हिडीओ बनविला असावा, असा अंदाज म्हापसा पोलिसांकडून लावला जात आहे. गुरुवारी हा व्हिडीओ समाजमाध्यमातून सर्वदूर गेला. त्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. संशयित गांगुली तसेच पीडिता मूळ पश्चिम बंगाल येथील आहेत. गांगुली हा मागील काही वर्षांपासून म्हापसा शहरातील पेडे येथे जलतरणाचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. तर पीडित मुलगी गांगुलीकडून प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्यात आली होती. आपल्या आईवडिलांसमवेत म्हापसा येथे भाड्याच्या घरात राहायची. तिच्या पालकांनी पेडे-म्हापसा येथील जलतरणाच्या प्रशिक्षणासाठी भरती केले होते. संशयित सुरजीत गांगुली हा तिचा प्रशिक्षक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली पीडितेने राष्ट्रीय स्तरावर चांगल्या कामगिरीचे प्रदर्शनही केले होते. पीडितेचे आईवडील नसताना संशयित गांगुली याची तिच्या घरी ये-जा होती. त्याच्याकडून होत असलेला छळाचा प्रकार पीडितेने पालकांच्या कानीसुद्धा घातला होता. त्यानंतर तिने स्वत: या प्रकाराचे चित्रीकरण केले होते.
विनयभंग केल्याप्रकरणी जलतरण प्रशिक्षक सुरजीत गांगुलीला दिल्लीत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 8:30 PM