मुंबई : अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणा-या ‘स्विमॅथॉन २०१७’ स्पर्धेची सोमवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली.यंदाचे सहावे वर्ष असलेल्या या स्पर्धेची रंगत गोव्यातील कोलवा समुद्रकिनारी ३ डिसेंबरला रंगेल. दखल घेण्याची बाब म्हणजे खुल्या समुद्रामध्ये होत असलेल्या या आव्हानात्मक स्पर्धेसाठी विशेष त्रिकोणीय मार्गिका तयार करण्यात येणार असून, असा प्रयोग पहिल्यांदाच देशात होत असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली.स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेकडे राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा म्हणूनही पाहिले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धक जलतरणपटूंमध्ये मोठी स्पर्धा या वेळी पाहण्यास मिळेल.पुरुष व महिला गटात होणाºया या स्पर्धेत १० किमी आणि ५ किमी अंतराची होईल. या स्पर्धेतील विजेते खेळाडू आगामी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने जेतेपदासाठी स्पर्धकांत मोठे आव्हान असेल; शिवाय आगामी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही सहभागी होण्याची संधी या स्पर्धेतून खेळाडूंना मिळणार आहे.गेल्या वर्षी या स्पर्धेत सुमारे ६०० जलतरणपटूंचा सहभाग लाभला होता, तर यंदा हीच संख्या हजारच्या पुढे जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. १० किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्या पुरुष - महिला जलतरणपटूंना प्रत्येकी ५० हजार, तर ५ किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक जिंकण्याची संधी असेल. तसेच, खुल्या जलतरण क्रीडा प्रकाराच्या प्रसारासाठी आणि नवोदितांना अधिक आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेत १ किमी आणि २.५ किमी अंतराची विशेष शर्यतही आयोजित करण्यात येणार आहे.>नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत माझी कामगिरी खूप चांगली झाली. त्यातून मिळालेला आत्मविश्वास मला आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खूप फायदेशीर ठरेल; शिवाय आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी मी कसून तयारी करीत आहे. यासाठी मी सरकारकडे कोल्हापूरहून मुंबईत बदली करून घेण्याची विनंती केली होती आणि माझी विनंती त्यांनी लगेच मान्यही केली. खुल्या समुद्रात पोहणे नक्कीच आव्हानात्मक असेल. त्यासाठी सर्वच जलतरणपटूंना कठोर मेहनत घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे हौशी जलतरणपटूंना ही स्पर्धा एक सुवर्णसंधी असेल.- वीरधवल खाडे, जलतरणपटू
गोव्यातील खुल्या समुद्रात रंगणार स्विमॅथॉनचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:30 AM