Syed Modi International Tournament, PV Sindhu vs Malvika Bansod: भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं आज झालेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मराठमोळी युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिचा पराभव करत जेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं मालविकाचा २१-१३, २१-१६ असा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. पी.व्ही सिंधूनं स्पर्धेचं जेतेपद प्राप्त केलं असलं तरी नागपूरच्या युवा बॅडमिंटनपटू मालविकानं देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अवघ्या २० वर्षांच्या मालविकानं स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे 'फुलराणी' म्हणून ओळख असलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा खेळ पाहत मोठी झालेल्या मालविकानं इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या सायना नेहवालचा पराभव करत आपल्या खेळाची चुणूक दाखवून दिली होती.
सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी अवघ्या ३५ मिनिटांत संपुष्टात आली. पीव्ही. सिंधूनं आपल्या अनुभवाच्या जोरावर सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड निर्माण केली होती. सिंधूनं २१-१३ नं पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही मालविकाला पुनरागमनाची संधी दिली नाही. दुसरा गेम २१-१६ नं जिंकून सिंधूनं जेतेपदावर कब्जा केला आहे. पीव्ही सिंधूचं तिच्या बॅडमिंटन करिअरमध्ये दुसऱ्यांदा सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद प्राप्त केलं आहे. याआधी सिंधूनं २०१७ साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.