ऑनलाइन लोकमत
रांची, दि. २६ - भारतीय महिला क्रिकेट संघाने तिस-या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवत ही मालिकाही ३-० अशी जिंकली आहे. श्रीलंकेच्या ९० धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या १३.५ षटकांत १ गडी गमावून पूर्ण केले आणि हा सामाना ९ विकेट्स राखून जिंकला. स्मृती मंधानाने नाबाद ४३ धावांची खेळी करत हे लक्ष्य सहज गाठून दिले.
या मालिकेतील दोन्ही सामने आधीच गमावलेल्या श्रीलंकेच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावत अवघ्या ८९ धावा केल्या. भारतातर्फे एकता बिश्तने ३ तर अनुजा पाटीलने २ आणि दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी १ बळी टिपत श्रीलंकेच्या संघाला खिंडार पाडले.
श्रीलंकेच्या ९० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतातर्फे वेल्लास्वामी वनिता आणि स्मृती मंधाना मैदानात उतरल्या आणि त्यांनी जोरदार फटकेबाजी करत भारतला विजयासमीप आणले. मात्र ८व्या षटकांत भारताच्या ६४ धावा झालेल्या असतानाच वेल्लास्वामी वनिता ३४ धावांवर बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर वेदा कृष्णमूर्ती व स्मृतीने खेळ सावरून १३.५ षटकांतच ९० धावांचे लक्ष्य गाठून भारताला तिसरा सामनाही जिंकून दिला आणि या मालिकेत निर्भेळ यश मिळवले.