मुंबई : पुरुष आणि महिला गटाची टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात पुढील वर्षी ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. नागपूरसह आठ शहरांत २७ दिवस पुरुष गटात ३५ आणि महिला गटात २३ सामने खेळविले जातील. बहुप्रतीक्षित भारत-पाक लढत १९ मार्च रोजी धर्मशाला येथे होणार असून, त्याआधी भारताला सलामीचा सामना न्यूझीलंडविरुद्ध १५ मार्च रोजी खेळायचा आहे. बंगळुरू, चेन्नई, मोहाली, कोलकाता, मुंबई आणि दिल्ली या शहरातदेखील सामन्यांचे आयोजन होईल.भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. भारताचा तिसरा सामना बंगळुरू येथे २३ मार्च रोजी ‘अ’ गटातील पात्रता फेरीतील विजेत्याविरुद्ध; तसेच चौथा सामना २७ मार्च रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध होईल. यानुसार सेमिफायनल नवी दिल्ली आणि मुंबईत क्रमश: ३० आणि ३१ मार्च रोजी होतील. ३ एप्रिल रोजी ईडन गार्डनवर अंतिम सामना रंगणार आहे. आयसीसीने शुक्रवारी स्पर्धेच वेळापत्रक जाहीर केले. ठाकूर म्हणाले, ‘महिला गटाच्या सेमिफायनल्स आणि फायनल आटोपल्यानंतर, पुरुष गटाच्या बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. फायनलसाठी एक राखीव दिवस असेल. पुरुष गटात बक्षिसांची एकूण रक्कम ५६ लाख डॉलर असून, २०१४ च्या तुलनेत ही रक्कम ८६ टक्के अधिक आहे. महिला गटात बक्षिसांची रक्कम चार लाख डॉलर असेल. बांगलादेशात झालेल्या मागच्या विश्वचषकाच्या तुलनेत ही रक्कम १२२ टक्के जास्त आहे.’ महिला गटाचे सामने १५ ते २८ मार्च या काळात खेळविले जातील. पुरुषांमध्ये पहिल्या फेरीसाठी प्रत्येकी चार संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. विजेत्यांना सुपर टेनमध्ये अन्य आठ संघांसोबत खेळण्याची संधी राहील. सुपर टेनमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. महिला गटातील दहा संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार असून प्रत्येक गटातील दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहेत. पुरुष गटाचे पहिल्या फेरीचे सामने ८ ते १३ मार्च या काळात धर्मशाला व नागपुरात होतील. बांगला देश, हॉलंड, आयर्लंड आणि ओमान हे संघ अ गटांत असून झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग व अफगाणिस्तान ब गटात आहेत. ८ मार्चला सकाळी झिम्बाब्वे-हाँगकाँग आणि सायंकाळी स्कॉटलंड-अफगाणिस्तान या लढती नागपुरात होतील. या गटातील विजेते दोन संघ आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि भारतासोबत सुपर टेनमध्ये खेळणार आहेत. पुरुष गटात गतविजेत्या श्रीलंकेला ग्रुप वनमध्ये द. आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड तसेच ग्रुप बमधील विजेत्यांसोबत स्थान देण्यात आले. लंकेचा सामना ग्रुप ‘ब’मधील विजेत्याविरुद्ध १७ मार्च रोजी कोलकता येथे होईल. २० मार्च रोजी बंगळुरू येथे वेस्ट इंडिज, २६ मार्च रोजी दिल्लीत इंग्लंडविरुद्ध खेळल्यानंतर २८ मार्च रोजी दिल्लीतच द. आफ्रिकेविरुद्ध लंकेला दोन हात करावे लागणार आहेत. यजमान भारत ग्रुप टूमध्ये असून या गटात २००९ चा विजेता पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ग्रुप ‘अ’च्या विजेत्याचा समावेश आहे. पाक संघ १६ मार्च रोजी कोलकता येथे ग्रुप ‘अ’च्या विजेत्याविरुद्ध खेळेल. त्यानंतर १९ ला भारत-पाक लढत होईल. पाकला मोहाली येथे २२ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध आणि २५ मार्च रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळावे लागेल. महिलांमध्ये २००९ चा चॅम्पियन इंग्लंड ‘ब’ गटात वेस्ट इंडिज, भारत, पाक आणि बांगला देशसोबत आहे. ‘अ’ गटात आॅस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका आणि आयर्लंड यांचा समावेश राहील. (वृत्तसंस्था)नागपुरात होणाऱ्या लढती८ मार्च : झिम्बाब्वे-हाँगकाँग, स्कॉटलंड-अफगाणिस्तान.१० मार्च : स्कॉटलंड-झिम्बाब्वे, हाँगकाँग-अफगाणिस्तान.१२ मार्च : झिम्बाब्वे-अफगाणिस्तान, स्कॉटलंड-हाँगकाँग.१५ मार्च : भारत-न्यूझीलंड.१८ मार्च : आॅस्ट्रेलिया-द. आफ्रिका (महिला).२१ मार्च : आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड (महिला).२५ मार्च : द. आफ्रिका-वेस्ट इंडीज.२७ मार्च : क्वॉलिफायर वन बी-वेस्ट इंडीज.मुंबईत होणारे सामने१६ मार्च : वेस्ट इंडीज वि. इंग्लंड१८ मार्च : द. आफ्रिका वि. इंग्लंड२० मार्च : द. आफ्रिका वि. क्वॉलिफायर वन बी.३१ मार्च : दुसरी उपांत्य लढतसुपर टेन ग्रुप वन विजयी सुपर टेन ग्रुप टू उपविजयी१९८७, १९९६ आणि २०११ च्या वन-डे विश्वचषकासारखेच यशस्वी आणि उत्कृष्ट आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. आयसीसी-बीसीसीआयच्या संयुक्त प्रयत्नातून हे आयोजन संस्मरणीय करू. मी जगभरातील क्रिकेटशौकिनांना भारतीय संस्कृती आणि आदरातिथ्याची मेजवानी स्वीकारण्यासाठी येथे आमंत्रित करतो.- शशांक मनोहर, अध्यक्ष आयसीसी
टी-२०चा थरार ८ मार्चपासून
By admin | Published: December 12, 2015 3:25 AM