ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - पुढील वर्षी ८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान भारतात रंगणा-या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत व पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असून त्यांच्यात १९ मार्च रोजी धरमसाला येथे सामना रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. आयसीसीने या संदर्भात आज सविस्तर माहिती दिली आहे. राजकीय परिस्थितीमुळे दोन्ही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांशी क्रिकेट मालिका खेळतील की नाही याबाबत संभ्रम असला तरी आता वर्ल्डकपमध्ये ते एकमेकांना नक्की भिडतील हे स्पष्ट झाले आहे.
भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी १५ मार्च रोजी नागपूरला तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ मार्च रोजी मोहाली येथे रंगणार आहे. या वर्ल्डकपमध्ये एकूण ५८ सामने होणार असून यामध्ये ३५ पुरुषांचे तर २३ महिलांचे सामने आहेत. बेंगळुरू, चेन्नई, धरमसाला, कोलकाता, मोहाली, मुंबई, दिल्ली व नागपूर येथे सामने होणार आहेत.
नवी दिल्ली व मुंबई येथे अनुक्रमे ३० मार्च व ३१ मार्च रोजी उपांत्य फेरीचे सामने रंगणार असून ३ एप्रिल रोजी कोलकात्यात ईडन गार्डनमध्ये अंतिम सामना होणार आहे. भारतामध्ये क्रिकेट हा धर्म असून भारताइतकं क्रिकेटवेड क्वचितच अन्य देशात बघायला मिळेल अशी टिप्पणी आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या वर्ल्ड कपचे अत्यंत यशस्वीपणे आयोजन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महिलांचे सामने संपल्यानंतर पुरूषांचे सामने सुरू होणार आहेत. पुरूष वर्ल्डकपसाठी एकूण ५.६ दशलक्ष डॉलर्सची बक्षीसे आहेत तर महिलांच्या वर्ल्ड कपसाठी ४ लाख डॉलर्सची बक्षीसे आहेत.