ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - वानखेडे स्टेडियमवर आज रात्री भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये उपांत्यफेरीचा थरार रंगणार आहे. भारताला विजयासाठी फेव्हरेट मानण्यात येत असले तरी, वेस्ट इंडिजलाही कमी लेखून चालणार नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत टी-२०चे चार सामने झाले असून, त्यातील दोन्ही संघांची विजयाची टक्केवारी ५०-५० आहे. भारताने दोन तर, वेस्ट इंडिजने दोन सामने जिंकले आहेत.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-वेस्ट इंडिजमध्ये एकूण तीन सामने झाले आहेत. त्यात वेस्टइंडिजने दोन तर, भारताने एक सामना जिंकला आहे.
दोन्ही संघांमध्ये पहिला टी-२० चा सामना १२ जून २००९ रोजी लॉडर्सवर झाला. त्यावेळी वेस्ट इंडिजने सात गडी राखून सामना जिंकला.
९ मे २०१० रोजी ब्रिजटाऊनला झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर १४ धावांनी विजय मिळवला.
चार जून २०११ रोजी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर १६ धावांनी विजय मिळवला.
२३ मार्च २०१४ रोजी ढाक्यामध्ये झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय मिळवला होता.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज प्रथमच उपांत्यफेरीत समोरासमोर आले आहेत.
टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांच्या उपांत्यफेरीचा रेकॉर्ड बघितल्यास भारताने उपांत्यफेरीतील विजयाचा रेकॉर्ड २-० आहे. २००७ मध्ये भारताने पहिल्यांदा डरबनमध्ये उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियावर १५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ढाक्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर सहागडी राखून विजय मिळवला होता.
याउलट वेस्ट इंडिजचा तीन पैकी दोन उपांत्यफेरीत पराभव झाला आहे. २०१२ मध्ये वेस्ट इंडिजने अंतिम फेरी गाठली होती. पण २००९ आणि २०१४ च्या उपांत्यफेरीत पराभव झाला होता.
या वर्ल्डकपमध्ये वानखेडेवर झालेल्या चार सामन्यामध्ये १७७, १८२, २०९ आणि २२९ धावसंख्या उभारली गेली. त्यातील अफगाणिस्तानचा अपवाद वगळता तीनवेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने १७२ धावांपर्यंत मजल मारली होती.