ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १९ - टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये शनिवारी झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. डकवर्थ लुईसनुसार पाकिस्तानला विजयी घोषीत करण्यात आलं आहे. अटीतटीच्या या सामन्यात भारत कडवी झुंज देत असताना पावसामुळे भारत संघाच्या प्रयत्नावर पाणी फेरलं गेलं. फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेला भारत - पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवण्यात आला होता.
भारताने पाकिस्तानला 7 विकेट गमावत 97 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पाकिस्तानने पाठलाग करताना 6 विकेट गमावत 77 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. मात्र अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. शेवटी 'डकवर्थ लुईस' नियमानुसार पाकिस्तान संघाकडे असलेल्या 2 धावांच्या आघाडीमुळे पाकिस्तान संघाला विजेता घोषीत करण्यात आलं.
पाकिस्तानने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने पहिली बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 96 धावा केल्या होत्या. भारताकडून वेदा कृष्णमुर्तीने सर्वात जास्त 24 धावा केल्या होत्या. मिताली राजला 1500 धावा पुर्ण करण्यासाठी 48 धावांची गरज होती. मात्र मिताली राज 16 धावांवरच बाद झाल्याने टी20मध्ये 1500 धावा करणारी पहिली आशियाई महिला खेळाडू होण्याचा विक्रम हुकला. पाकिस्तानकडून सिदरा अमीनने सर्वात जास्त 26 धावा केल्या. अनम अमीनला प्लेअर ऑफ द मॅच घोषीत करण्यात आलं.