ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १९ - टी20 वर्ल्ड कपमध्ये धोनी ब्रिगेड पाकिस्तानविरोधात मैदानात उतरण्याआधी महिला क्रिकेट संघ पाकिस्तान संघाचा सामना करत आहे. दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानात हा सामना सुरु आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
पाकिस्तानविरोधात भारताची सुरुवात मात्र अडखळत झाली आहे. भारताने 3 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावले आहेत. दुस-याच ओव्हरमध्ये वनिता 2 धावांवर झेलबाद झाली तर तिस-या ओव्हरमध्ये स्मृती मंधना एक धाव करुन पायचीत झाली. भारताने सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्याने भारताला सावरुन खेळावं लागणार आहे. भारताने पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशला हरवल्यामुळे भारत आपली विजयी मालिका सुरु ठेवेल अशी आशा आहे.
2012च्या वर्लडकपमध्ये पाकिस्तानने भारतात पराभव केला होता मात्र 2014 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत पराभव केला होता. मिताली राजला 1500 धावा पुर्ण करण्यासाठी 48 धावांची गरज आहे. त्यानंतर मिताली राज टी20मध्ये 1500 धावा करणारी पहिली आशियाई महिला खेळाडू ठरणार आहे. संध्याकाळी धोनी ब्रिगेड नागपुरमध्ये पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघदेखील पाकिस्तानला हरवून धोनी ब्रिगेडचा आत्मविश्वास वाढवण्याच्या तयारीने मैदानात उतरली आहे.
भारतीय संघ - मिताली राज, वनिता, स्मृती मंधना, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमुर्ती, अनुजा पाटील, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, सुषमा वर्मा, पुनम यादव, राजेश्वरी गायकवाड
पाकिस्तान संघ - सिदरा अमीन, नाहीदा खान, बिसमाह मरुफ, मुनीबा अली, इरम जावेद, इकबाल, सना मीर, निदा दार, सिदरा नवाझ, अनम अमीन, सादीया युसूफ