Prize Money Difference: T20 World Cup 2022 नुकताच संपला. आता पुढील आठवड्यात फुटबॉल विश्वचषक (FIFA World Cup 2022) सुरू होणार आहे. ही स्पर्धा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. कतारकडे यंदाचे यजमानपद असून या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. फिफा विश्वचषक प्रथमच आखाती देशांमध्ये खेळवला जात आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. त्यात आशिया खंडातील ६ संघ आहेत. टी२० विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन आणि उपविजेत्या संघांसह इतर सर्व संघांना बक्षीस रक्कम वितरित करण्यात आली. पण फिफा विश्वचषकात आता जेतेपद आणि बक्षिसाच्या रकमेसाठी संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. कारण फुटबॉल विश्वचषक विजेत्याला मिळणारी रक्कम ही क्रिकेट विश्वचषक विजेत्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असणार आहे.
फिफा विश्वचषक चॅम्पियनला २६ पट अधिक बक्षीस रक्कम
क्रिकेट आणि फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या दोन्ही संघांना किती पैसे मिळतात हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. याबद्दल महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही विश्वचषकांच्या चॅम्पियन संघाला मिळालेल्या बक्षीस रकमेत जवळपास २६ पट फरक आहे. म्हणजेच FIFA विश्वचषक विजेत्या संघाला मिळणारी रक्कम ही टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघापेक्षा तब्बल २६ पट अधिक असणार आहे. ICC ने T20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण $5.6 दशलक्ष (45.14 कोटी रुपये) ची बक्षीस रक्कम निश्चित केली होती. ती सर्व १६ संघांमध्ये वेगळ्या पद्धतीने वाटली गेली. अंतिम फेरीच्या चॅम्पियन संघाला सुमारे १३ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर उपविजेत्या संघाला सुमारे ६.४४ कोटी रुपये मिळाले. FIFA विश्वचषक स्पर्धेत मात्र बक्षीस म्हणून तब्बल ३,५८५ कोटी रुपयांचे इनाम असणार आहेत.
यावेळी फिफा विश्वचषक कतारमध्ये आयोजित केला आहे. यासाठी बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वितरित करण्यात येणारी बक्षीस रक्कम $४४० दशलक्ष (सुमारे ३,५८५ कोटी रुपये) इतकी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला ४२ मिलियन डॉलर (सुमारे ३४२ कोटी रुपये) मिळतील. मागील २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम ४ दशलक्ष डॉलर्स जास्त आहे.
T20 चॅम्पियन्सच्या बक्षिसाची रक्कम IPL विजेत्यापेक्षा कमी
T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला केवळ फिफा विश्वचषकच नव्हे तर इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चॅम्पियन संघापेक्षाही कमी रक्कम मिळते. IPL 2022 चा हंगाम जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळाले. अशा परिस्थितीत वर्ल्ड कप चॅम्पियन्स इंग्लंडला केवळ १३ कोटी मिळाले.