नवी दिल्ली : क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार मिळाल्यानंतर राज्यवर्धनसिंह राठोड यांनी कामाला सुरुवात केली आहे. मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर राठोड यांनी बुधवारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानातील ‘साई’ च्या कार्यालयाला अनपेक्षित भेट दिली.१७ वर्षं गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल सामन्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले ४७ वर्षांचे राठोड यांनी अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी केली. आपण प्रशासक आहोत हे डोक्यातून काढून टाका. अधिकारशाही गाजविण्याऐवजी सेवेच्या भावनेतून खेळाडूंच्या मदतीला धावून जा, असा दम दिला. ‘साई’मध्ये खेळाडूंना मिळणाºया सुविधा, मैदानांची अवस्था या सर्वांचा क्रीडामंत्र्यांनी आढावा घेतला.भेटीची टिष्ट्वटर अकांउंटवर माहिती देताना राठोड यांनी आपल्यासाठी खेळाडू हे सर्वांत महत्त्वाचे असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘जेव्हा सर्वोत्तम कामाची अपेक्षा असते, तेव्हा फक्त चांगले काम करून भागत नाही. खेळाडू आणि त्यांना हव्या असलेल्या सोईसुविधा उपलब्ध करून देणे हे आपले आद्यकर्तव्य असेल. अधिकारी वर्ग आणि इतर बाबी दुय्यम असतील.’‘सन्मान आणि सुविधा या दोन मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देत क्रीडा मंत्रालयाने कारभार केला पाहिजे. देशातील प्रत्येक खेळाडूचा आदर होणे; तसेच त्यांना योग्य त्या सुविधा मिळणे हेच ध्येय सर्वांसमोर असले पाहिजे. या मंत्रालयाच्या कामकाजाची पद्धत बदलणे गरजेचे आहे. क्रीडा मंत्रालयात फक्त खेळाडू हाच व्हीआयपी असला पाहिजे, बाकी कुणीही नाही,’’ असे बजावत राठोड यांनी स्वत:च्या कामाची शैली अधिकारी वर्गाला समजावून दिली. राठोड हे सकाळी ९.१५ वाजता स्टेडियममध्ये दाखल झाले, तेव्हा अनेक अधिकारी यायचे होते.या मंत्रालयात मंत्री म्हणून येण्याआधी मी सर्व बाबी भोगल्या आहेत. एका पेपरवर सही करण्यासाठी खेळाडूंना किती वाट बघावी लागते,हे मी पाहिले आहे. यापुढे अशागोष्टी अजिबात व्हायला नको,असे राठोड यांनी स्पष्ट केले.सध्या राठोड यांच्यापुढे राष्ट्रकुल, आशियाई आणि आॅलिम्पिक खेळांसाठी भारतीय संघाला योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आहे. (वृत्तसंस्था)
अधिकारशाही डोक्यातून काढून टाका, क्रीडामंत्र्यांनी ‘साई’च्या अधिका-यांची केली कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:41 AM