मेलबोर्न : टीम इंडियासाठी नवा कोच निवडतेवेळी कर्णधार विराट कोहली यालादेखील विश्वासात घ्यावे, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डीन जोन्स याने मांडले. नव्या कोचची निवड विश्वचषक प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा करार २९ मार्च रोजी संपणार आहे. त्यांचा पर्याय शोधण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. टीम इंडियाचे संचालक असलेले रवी शास्त्री यांनी विश्वचषकानंतर आपण बीसीसीआयसोबत स्थायी भूमिका वठविण्यास इच्छुक असल्याचे आधीच संकेत दिले. माईक हसी याचेही नाव आले होते; पण हसीने शर्यतीतून माघार घेतली. जोन्सच्या मते विराट सध्या कसोटी कर्णधार असला तरी लवकरच त्याच्याकडे वन डे आणि टी-२० चे नेतृत्व येईल. आक्रमक कर्णधार या नात्याने कोचसोबत डावपेच आखावे लागतील. यामुळेच कोचची निवड करतेवेळी विराटचा विश्वास संपादन करायला हवा.’जोन्सने भारतीय क्रिकेटच्या भरभराटीसाठी नवे सूत्र सादर केले. तो म्हणाला, ‘२० गडी बाद करण्यात अपयश ही भारताची समस्या आहे. चार गोलंदाजांना हे शक्य होत नसेल तर पाच गोलंदाज खेळवावेत. याशिवाय या गोलंदाजांना धावा काढण्याची जबाबदारीही सोपवायला हवी.’
कोचनिवडीत कोहलीला विश्वासात घ्या : डीन जोन्स
By admin | Published: January 15, 2015 4:21 AM