नवी दिल्ली : श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभव हा निराशाजनक आहे. त्याला संघाचा बेजबाबदार खेळ कारणीभूत असून, पुढच्या सामन्यांसाठी भारताने या पराभवातून धडा घेण्याची गरज असल्याचे टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी सांगितले. बेजबाबदारपणे फटके मारणाऱ्या फलंदाजांवर गावसकर यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले की, संघातील फलंदाजांनी खेळपट्टीचा अभ्यास न करताच फटके लगावले. त्यामुळे ते बाद झाले. त्यांनी अनुभव नसलेल्या श्रीलंकन गोलंदाजांकडून शिकण्याची गरज आहे. त्यांनी वेगवान गोलंदाजीस मदत करणाऱ्या खेळपट्टीवर योग्य गोलंदाजी केली आणि भारताच्या दिग्गज फलंदाजांवर अंकुश लावला.गावसकर म्हणाले की, या खेळपट्टीवर सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावर मधल्या फळीने संयमाने फलंदाजी करणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. संघातील फलंदाजांनी आपली जबाबदारी समजून घेतली नसल्याची टीकाही गावसकर यांनी केली. (वृत्तसंस्था)
पराभवातून धडा घ्या
By admin | Published: February 11, 2016 3:25 AM