ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 16 - आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ अजून पूर्णपणे तयार झाला नसल्याचे कर्णधार मशरफी मुर्तजाने काल मान्य केले. आमच्याकडे कौशल्य आहे, शारीरीकदृष्टया सक्षम आहोत पण मोठया सामन्यांसाठी लागणारी मानसिक कणखरता आमच्याकडे नाहीय अशी कबुली मुर्तजाने काल सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत दिली.
भारताने गुरुवारी बांगलादेशवर 9 विकेटने दणदणीत विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यापूर्वी बलाढय भारतीय संघाला आपण रोखू शकतो असा बांगलादेशी क्रिकेट चाहत्यांचा समज झाला होता. पण टीम इंडियाने आपला क्लास आणि क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली. भारताकडून झालेल्या पराभवासाठी कर्णधार मुर्तजाने तमीन इक्बाल आणि मुशाफीकूर रहिमला जबाबदार धरले. या दोघांनी तिस-या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी करुन चांगला जम बसवला होता.
आणखी वाचा
भारतावर दबाव वाढवण्याच्या स्थितीमध्ये असताना या दोघांनी आपल्या विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या असे मुर्तजा म्हणाला. या पराभवानंतर मुर्तजा कर्णधारपदी कायम राहण्याची शक्यताही धुसर झाली आहे. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली होती. आम्ही 330 ते 340 धावा करायला हव्या होत्या. पण तमीम, मुशाफीकूर आणि शाकीबच्या विकेटमुळे आम्हाला फटका बसला.
ज्यूनियर क्रिकेटपटूंनी अशा महत्वाच्या सामन्यांमध्ये मोठी कामगिरी केली पाहिजे आणि तेच आमच्यासमोरचे आव्हान आहे असे मुर्तजा म्हणाला. आमच्या पराभवाने बांगलादेशी क्रिकेट चाहते नक्कीच निराश झाले आहेत पण पुढे गेले पाहिजे. आगामी मालिकांमध्ये या पराभवाला मागे सोडून चांगला खेळ केला पाहिजे असे मुर्तजा म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली.
तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.