पणजी : सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली गोव्याची अव्वल मानांकित तनिशा क्रास्तो हिची कॅनडा येथे होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सलग तीन अखिल भारतीय मानांकन स्पर्धा जिंकल्यानंतर चंदिगड आणि पंचकुला या स्पर्धेतही तिने छाप सोडली आहे. त्यामुळे तनिशाने निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले. तनिशाने हे सत्र पूर्णपणे गाजवले. आता ती दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.नागपूर येथे ऐतिहासिक अशी दोन सुवर्णपदके पटकाविल्यानंतर गोव्याची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्तो हिने आपली सुवर्ण घोडदौड कायम राखली. हैदराबाद येथील अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतही तिने दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले होते. १५ वर्षीय तनिशाने आपली उत्तराखंडची जोडीदार आदिती भट्ट हिच्यासोबत खेळताना १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात विजेतेपद पटकाविले होते. महिलांमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविणे आणि आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविणे हे माझे स्वप्न आहे. हा खूप मोठा प्रवास असेल याची मला कल्पना आहे; परंतु मी त्याच दृष्टिकोनाने तयारी करीत असल्याचे तिने म्हटले आहे.दरम्यान, तनिशाच्या या निवडीचे गोवा बॅडमिंटन संघटनेकडून अभिनंदन करण्यात आले आहे. संघटनेचे सचिव संदीप हेबळे म्हणाले की, तनिशा सध्या म्यानमार येथे सुरू असलेल्या ज्युनियर आशियाई स्पर्धेत खेळत आहे. ही संधी मिळते न मिळते तोच तिने कॅनडा येथे नोव्हेंबरमध्ये होणाºया स्पर्धेतही स्थान मिळविले आहे. चंदिगड येथील स्पर्धेत तिने सलग तिसरे सुवर्ण आणि मिश्रदुहेरीत पदके मिळविली आहेत. गोवा बॅडमिंटन संघटनेची एक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असल्याने आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या पालकांचे, प्रशिक्षकांचे आणि सपोर्ट टीमचे आम्ही अभिनंदन करतो.
गोव्याच्या तनिशाला कॅनडाचे तिकीट; बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 9:12 PM