ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - आयपीएलच्या 10 व्या मोसमात फ्लॉप असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पुणे सुपरजायंटसने विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले आहे. तीन विकेटच्या मोबदल्यात पुण्याने 20 षटकात 157 धावा केल्या. पुण्याकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 45, मनोज तिवारी नाबाद 44, सलामीवीर राहुल त्रिपाठी 37 आणि धोनीने नाबाद 21 धावा केल्या.
नाणेफेक जिंकून बंगळुरुने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत झालेल्या ९ पैकी ६ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागलेल्या आरसीबीला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीचा पराभव झाल्यास त्यांचा आयपीएलच्या या सत्रातील प्रवास येथेच थांबणार आहे. त्याचबरोबर यांना येथून पुढील सर्व सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्सची स्थिती आरसीबीपेक्षा थोडी चांगली आहे. पुण्याने आठपैकी चार सामने जिंकले आहेत. मात्र, पुण्याचा संघही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यात अपयशी ठरला आहे.
आरसीबीची कामगिरी कशीही असली तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्यांच्याकडे विराट कोहली, ए. बी. डिव्हिलर्स व ख्रिस गेलसारखे स्फोटक फलंदाज आहेत. दुसरीकडे पुण्याचे गोलंदाज बेन स्टोक्स व इम्रान ताहिर यांनाही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. मात्र आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या आरसीबीच्या फलंदाजांना पुणे सुपरजायंट्सचे गोलंदाज अडचणीत आणू शकतात.