ऑनलाइन लोकमत
बंगलोर, दि. 24- इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या पर्वात साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावणा-या गुजरात लायन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसमोर विजयासाठी 159 धावांची आघाडी उभी केली आहे. गुजरात लायन्सनं निर्धारित 20 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्यात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
गुजरातकडून स्मिथनं सर्वाधिक धावांची खेळी करत 5 चौकार आणि 6 षटकार लगावत अर्धशतक पार करत 73 धावा केल्यात. तर फिंच 4, मॅक्युलम 1, रैना 1, जडेजा 3, ब्राव्हो 8, द्विवेदी 19, कुमार 1, कुलकर्णी 10 धावा काढून तंबूत परतले आहेत. कार्तिकही 30 चेंडूंत 26 धावांची खेळी करून माघारी फिरलाय. कार्तिक आणि स्मिथनं भेदक फलंदाजीच्या जोरावर 85 धावांची भागीदारी केली. सामना ऐन रंगात आला असताना चहलनं स्मिथचा बळी घेऊन गुजरातच्या धावसंख्येला लगाम घातला.
बंगलोरकडून उत्तम गोलंदाजीच्या जोरावर वॅटसननं रैना, जडेजा, द्विवेदी आणि ब्राव्होला घरचा रस्ता दाखवला. तर अब्दुल्ला, जॉर्डननं भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी 2 गडी मिळवले. तर आतापर्यंत गुजरातनं साखळी फेरीत 14 पैकी 9 सामन्यांत विजय मिळवून 18 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. तर आरसीबीनंही अखेरच्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आरसीबीनं 8 सामन्यांत विजय मिळवताना 16 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. या पहिल्या क्वालिफायर सामन्यात विजयी होणार संघ अंतिम फेरीत जाणार आहे. तर पराभूत संघालाही अंतिम फेरीत जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.