पॅरिस : खेळाडूंसाठी सर्वांत मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकचे व्यासपीठ सजले आहे. जगातील १०,५०० खेळाडूंप्रमाणे भारताचे ११७ खेळाडू शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज आहेत. यावेळी पदकांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. टोकियोत जिंकलेल्या सात पदकांमध्ये भर घालण्याच्या निर्धाराने सर्वच भारतीय प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत.
सर्वांवर अपेक्षांचे ओझे असले तरी कुस्तीपटू वगळता कोणत्याही प्रकारातील खेळाडूंनी तयारीबाबत तक्रार केलेली नाही. खेळाडूंना विदेशात सराव करायचा असो वा सर्वोत्कृष्ट सोयी प्रदान करणे असो, यात कुठलीही कसर शिल्लक ठेवण्यात आली नव्हती. आता निकाल देणे खेळाडूंच्या हातात आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकूण २५ पदके जिंकली. त्यात नेमबाज अभिनव बिंद्रा (२००८) आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा (२०२१) यांनी वैयक्तिक सुवर्ण जिंकून दिले.
- खरे सांगयाचे, तर टोकियोतील सात पदकांपर्यंत पोहोचणेदेखील सहज ठरू नये. चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राचा अपवाद वगळता अन्य कुणीही पदकाचे प्रबळ दावेदार दिसत नाही.
- ११७ जणांमध्ये ॲथलेटिक्स (२९), नेमबाजी (२१) आणि हॉकी (१९) या तीन खेळांत अर्धे खेळाडू आहेत. या ६९ खेळाडूंपैकी ४० जणांचे हे पहिले ऑलिम्पिक असेल. त्यादृष्टीने भारताला पुढे नेण्याची जबाबदारी पदार्पण करणाऱ्यांवर असेल.
- अनुभवी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, टेनिसपटू रोहन बोपन्ना, टेबल टेनिसचे दिग्गज शरत कमल आणि हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश यांचे हे अखेरचे ऑलिम्पिक असेल.
- हॉकी संघ ऑलिम्पिक आधी फॉर्ममध्ये नाही. दुसरीकडे, बॉक्सर आणि मल्लांना स्पर्धा करण्याची कमी संधी मिळाली. नेमबाजांनी मिश्र निकाल दिले असून, स्टपलचेसमध्ये अविनाश साबळे याने राष्ट्रीय विक्रम सातत्याने सुधारला. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ८:०९.९४ सेकंद अशी आहे. त्याचे फायनल गाठणे मोठी कामगिरी ठरणार आहे.
- नीरजसह चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी या बॅडमिंटन जोडीकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल. नीरजने आतापर्यंत ९० मीटरचा पल्ला गाठला नाही. मात्र, तो कामगिरीत सतत सुधारणा करीत आहे. नीरजला सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी असेल.
- सिंधूने २०१६ आणि २०२१ ला पदक जिंकले होते. यंदा येथेही तिसरे पदक जिंकण्याची संधी तिच्याकडे असेल. मात्र, अलीकडचा तिचा फॉर्म आणि येथे मिळालेला कठीण ड्रॉ पाहता चिंता वाढली.
- हॉकीत भारताने टोकियोमध्ये कांस्य जिंकून ४१ वर्षांची प्रतीक्षा संपविली; पण, अलीकडे संघाच्या कामगिरीत सातत्य जाणवत नाही. पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर आणि लय कायम राखणे, ही सर्वांत मोठी चिंता आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यासोबत संघाला कठीण गट मिळाला.
- नेमबाजीत भारताचे २१ खेळाडू आव्हान सादर करतील. मनू भाकर आणि सौरभ चौधरी हे पदकाच्या शर्यतीत असतील. याशिवाय सिफत कौर सामरा (५० मीटर थ्री पोझिशन), संदीप सिंग (१० मीटर एअर रायफल) आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर (५० मीटर रायफल) यांच्यात पदक जिंकण्याची क्षमता जाणवते.
- कुस्तीत भारताने मागच्या चारही ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली. यंदा पुरेशी तयारी होऊ शकली नाही. तरीही अंशू मलिक, अंतिम पंघाल आणि अमन सहरावत यांच्याकडून अपेक्षा आहेत. २३ वर्षांखालील विश्वविजेती रितिका हुड्डा हीदेखील मुसंडी मारू शकते.
- तिरंदाजी, टेटे संघांना यांना रँकिंगच्या आधारे स्थान मिळाले. तिरंदाजांना पहिल्या पदकाची प्रतीक्षा असेल. मागच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारोत्तोलक मीराबाई चानू काही महिन्यांपासून दुखापतींनी त्रस्त आहे.
- बॉक्सिंगमध्ये निखत झरीन आणि निशांत देव यांच्याकडून अपेक्षा बाळगता येतील.
आज दिमाखदार उद्घाटन सोहळा
पॅरिस ऑलिम्पिकचे दिमाखदार उद्घाटन भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री ११ वाजता होईल. २०६ देशांमधील १०,५०० खेळाडू पथसंचलनात सहभागी होणार असून, साडेतीन तास चालणाऱ्या या नेत्रदीपक सोहळ्यात फ्रान्सच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे सादरीकरण आहे. सीन नदीच्या पात्रात सहा किमी लांब परेडद्वारे सोहळ्याचे भव्यदिव्य सादरीकरण केले जाईल. यावेळी ३ लाख २० हजार प्रेक्षकांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांंनी सांगितले. भारताचे ११७ खेळाडू पथसंचलनात सहभागी होतील. शरत कमल आणि पी. व्ही. सिंधू हे भारतीय ध्वजवाहक असतील.
पावसाचे संकट
उद्घाटन सोहळ्यात पावसाची तीव्र शक्यता वर्तविण्यात आल्याचे हवामान खात्याचे मेटियो फ्रान्स यांनी म्हटले आहे. आयोजकांची चिंताही वाढली तरी पाऊस बरसल्यानंतरही उद्घाटन सोहळा निर्धारित वेळेनुसारच सुरू होईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
उद्घाटन : रात्री ११ वाजेपासून थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ नेटवर्क लाइव्ह स्ट्रिमिंग : जियो सिनेमा