लंडन : एस. व्ही. सुनील आणि निकीन तिमय्या यांनी नोंदविलेल्या गोलमुळे एशियाडच्या सुवर्णविजेत्या भारतीय संघाने कोरियाचे कडवे आव्हान मोडीत काढून मंगळवारी २-१ ने विजयासह एफआयएच चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे आगेकूच केली आहे.चार सामन्यांत भारताचा हा दुसरा विजय असून, सात गुणांसह तो दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोरियाचा चार सामन्यांतील हा तिसरा पराभव होता. कोरियाचा संघ फायनलच्या चढाओढीतून बाहेर पडला. कोरियाच्या खात्यात तीन गुण आहेत. भारताच्या शानदार विजयात सुनीलने ३९व्या आणि तिमय्याने ५७व्या मिनिटाला गोल केला. कोरियाकडून एकमेव गोल किम जुहून याने ५७व्या मिनिटालाच केला. फायनलच्या चढाओढीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. मागच्या सामन्यात बेल्जियमने भारताला २-१ ने पराभूत केले होते; पण कोरियाविरुद्ध साजरा केलेला विजय विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी संजीवनी ठरणार आहे. आजच्या सामन्यात आशियातील दोन्ही संघ पहिल्या दोन्ही क्वार्टरमध्ये एकमेकांची बचाव फळी भेदण्यासाठी डावपेच आखत राहिले. अखेर मनप्रीतने सुनीलला डी मध्ये पास दिला व त्याने प्रतिस्पर्धी बचाव फळी भेदून गोल केला. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला एकूण तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण ते तिन्ही वाया गेले. ५७व्या मिनिटाला भारताची बचाव फळी भेदून किमने गोल करताच बरोबरी झाली. पण, पुढच्याच क्षणी तिमय्याने गोल नोंदवून संघाला पुन्हा आघाडी मिळवून दिली. अखेरच्या दोन मिनिटांत आकाशदीपकडे चांगली संधी होती; पण संधीचे सोने करण्यात तो चुकल्याने भारताची आघाडी २-१ अशीच राहिली.(वृत्तसंस्था)
टीम इंडियाची कोरियावर मात
By admin | Published: June 15, 2016 5:20 AM