ब्रिस्बेन : शनीची साडेसाती मागे लागली की कितीही प्रयत्न केले तरी कामे यशस्वी होत नाहीत, अशी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणा, पण आहे. तसाच पराभवाचा शनी टीम इंडियाच्या पाठी लागलेला दिसतो आहे. आॅस्ट्रेलियाविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकता जिंकता हारण्याची नामुष्की गेल्या शनिवारी भारतावर आली होती. भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी तोही शनिवारीच पराभूत झाला. उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांच्या उणिवा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या. दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावातील ४०८ धावांना आॅसींनी ५०५ धावांनी प्रत्युत्तर दिले. पण दुसऱ्या डावात भारत स्वत:ला सावरू शकला नाही. शेर म्हणवून घेणारे सारे दिग्गज फलंदाज सहज ढेर झाले. विराट कोहली १ धाव, रोहित शर्मा आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाले. शिखर धवनशिवाय कोणीही मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. आॅसींसमोर केवळ १३० धावांचे टार्गेट ठेवून अख्खी टीम इंडिया तंबूत परतली. त्यानंतर आॅसींनी हा सामना ४ गडी आणि एक दिवस शिल्लक राखून जिंकला.
टीम इंडियाला पराभवाचा ‘शनी’
By admin | Published: December 21, 2014 2:35 AM