नवी दिल्ली : संयम सोडणारा आणि अतिआक्रमक कसोटी कर्णधार विराट कोहली याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘टीम इंडिया’ला दमदार कोचची गरज असल्याचे मत माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले. कोहलीला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी अशाच कोचची गरज राहील, यावर बेदी यांनी भर दिला आहे.कोहली फारच आक्रमक असल्याने मनाविरुद्ध काही घडल्यास तो संयम सोडून देतो. त्याचा हा स्वभाव बदलायला हवा. हा काही कबड्डी किंवा खो-खोचा खेळ नाही. दीर्घकाळ मैदानात राहायचे झाल्यास भावनांवर संयम राखायलाच हवा, असे बेदी म्हणाले. कोहलीच्या आक्रमक स्वभावाची ‘मीडिया’च्या एका गटाने प्रशंसा केली आहे. यावर बेदी नाखूष दिसले. ते म्हणाले,‘ मीडियाने कोहलीचा हा स्वभाव बनविला आहे आणि ‘मीडिया’च त्याला खड्ड्यात टाकेल. विराटने सावध राहावे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर सारखी नजर असते. विराट चमचा डाव्या किंवा उजव्या हातात पकडतो, यावरही मीडियाची नजर असते. ’हरभजनसिंग याला दोन वर्षांनंतर कसोटी संघात स्थान मिळाल्याबद्दल सवाल करताच बेदी म्हणाले,‘ बीसीसीआय मागे का जात आहे? संघात चांगल्या फिरकी गोलंदाजाचा अभाव असल्याच्या सुनील गावस्कर यांच्या मताशीदेखील बेदी असहमत दिसले. ते म्हणाले, असा काही अभाव असल्याचे जाणवत नाही. आम्हा सर्वांनी कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे काय? ‘आयपीएल’मुळे चांगले फिरकीपटू मिळेनासे झाले आहेत.एखाद्या फिरकी गोलंदाजाने निर्धाव चेंडू टाकला की समालोचक लगेच त्याचे कौतुक करतो. एका चेंडूमुळे तो फिरकी गोलंदाज उत्कृष्ट कसा होऊ शकेल? (वृत्तसंस्था)‘आयपीएल’मध्ये चार षटके गोलंदाजी करणाऱ्या कर्ण शर्मा याला कसोटी संघात स्थान दिल्याबद्दल बेदी नाराज दिसले. कर्णच्या निवडीबद्दल ते म्हणाले,‘कर्ण ३५-४० प्रथमश्रेणी सामने खेळला पण त्यात त्याने काय केले? ‘आयपीएल’मुळे युवा खेळाडूंची दिशाभूल होत आहे. पंजाबचा सलामीवीर मनन व्होरा, उन्मुक्त चंद, संजू सॅमसन हे युवा खेळाडू कन्फ्यूज असल्याचे बेदी यांचे मत होते. नवा खेळाडू सर्फराज खान हा प्रतिभावान, असला तरी प्रथम श्रेणी सामन्यात त्याने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करावी’, असे बेदी यांनी सांगितले. कोहलीच्या आक्रमणावर नियंत्रण राखू शकेल, असा दमदार कोच ‘टीम इंडिया’कडे आहे काय़ असे विचारताच बेदी यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. ते म्हणाले,‘रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांचा कोहलीप्रती जो विचार असेल तो सचिन आणि द्रविडच्या तुलनेत एकदम वेगळा असेल.’ कोहली खेळावर फोकस करण्यात कमी पडतो का, या प्रश्नावर बेदी म्हणाले,‘माझ्यामते असे घडू नये.’
टीम इंडियाला दमदार कोच हवा
By admin | Published: May 22, 2015 12:55 AM