रांची : चेतेश्वर पुजाराने द्विशतकी खेळीदरम्यान खेळपट्टीवर विक्रमी वेळ तळ ठोकण्याचा पराक्रम केला, तर रिद्धिमान साहाने झुंजार शतक झळकाविले. यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी १५२ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात आॅस्ट्रेलियाची २ बाद २३ अशी अवस्था करीत सामन्यावर पकड मजबूत केली.भारताने आॅस्ट्रेलियाच्या ४५१ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना पहिला डाव ९ बाद ६०३ धावसंख्येवर घोषित केला. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने (सहा धावांत २ बळी) त्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१४) व नाईट वॉचमन नॅथन लियोन (२) यांचा त्रिफळा उडवून आॅस्ट्रेलियाचा डाव अडचणीत आणला. आॅस्ट्रेलिया संघ अद्याप १२९ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मॅट रेनशॉ ७ धावा काढून खेळपट्टीवर होता. रिव्ह्यूमध्ये नशिबाची साथआॅस्ट्रेलिया संघ डीआरएसबाबत कमनशिबी ठरला. साहा याला वैयक्तिक १९ आणि पुजाराला वैयक्तिक १५७ धावांवर असताना पंचांनी बाद दिले होते, पण रिव्ह्यूमध्ये फलंदाजांच्या बाजूने कौल मिळाला. साहा याला कमिन्सच्या आजच्या पहिल्याच चेंडूवर पंच ख्रिस गफा यांनी बाद दिले होते. पण भारताने रिव्ह्यू घेतल्यानंतर चेंडू डाव्या यष्टिबाहेर जात असल्याचे स्पष्ट झाले. मैदानी पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. साहा वैयक्तिक ५१ धावांवर असताना सुदैवी ठरला. त्यावेळी फिरकीपटू स्टीव्ह ओकीफेच्या चेंडूवर त्याचा उडालेला झेल यष्टिरक्षक मॅथ्यू वेडला टिपण्यात अपयश आले. आॅस्ट्रेलियाने त्यानंतर लियोन व कमिन्स यांच्या गोलंदाजीवर साहाविरुद्ध यष्टिपाठी झेल टिपल्याचे अपील करीत डीआरएसचा आधार घेतला. दोन्ही वेळेला मैदानावरील पंचांचा नाबाद ठरविण्याचा निर्णय कायम राहिला. साहा त्यावेळी अनुक्रमे ५९ व ८२ धावा काढून खेळपट्टीवर होता. (वृत्तसंस्था)चेतेश्वरने द्रविडचा विक्रम मोडला!पुजारा एका डावात ५०० पेक्षा अधिक चेंडू खेळणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने कारकिर्दीतील तिसऱ्यांदा तर आॅस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्यांदा द्विशतकी खेळी केली. पुजाराने द्विशतकी खेळीदरम्यान ५२५ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकारांच्या मदतीने २०२ धावा केल्या. चेंडूंचा विचार करता सर्वांत मोठी खेळी करताना पुजाराने त्याचा आदर्श असलेल्या राहुल द्रविडचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. द्रविडने एप्रिल २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २७० धावांची खेळी करताना ४९५ चेंडू खेळले होते. पुजाराने पाच सत्रांपेक्षा अधिक वेळ फलंदाजी करताना खेळपट्टीवर ११ तास १२ मिनिट तळ ठोकला. आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने २३३ चेंडूंना सामोरे जाताना आठ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. साहा याने पुजारासोबत सातव्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. जडेजाने ५५ चेंडूंमध्ये पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा फटकावीत भारताला दीडशेपेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून दिली. जडेजा-उमेशची आक्रमक ५४ धावांची भागीदारीजडेजा व उमेश यादव (१६) यांनी नवव्या विकेटसाठी आक्रमक ५४ धावांची भागीदारी केली. जडेजाने लियोन व ओकीफे यांच्या गोलंदाजीवर षटकार ठोकले तर यादवने कमिन्सच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले. यादव ओकीफेच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिड आॅफला वॉर्नरकडे झेल देत माघारी परतला. जडेजाने कमिन्सच्या त्यानंतरच्या षटकात चौकार ठोकर ५१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याने त्या षटकात अखेरच्या चेंडूवरही चौकार ठोकत संघाला ६०० धावांचा पल्ला ओलांडून दिला आणि दीडशेपेक्षा अधिक धावांची आघाडी निश्चित केली. त्यानंतर कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या दिवशी जडेजाला खेळणे आव्हान : लीमनपाच डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश असलेल्या आॅस्ट्रेलियन संघाला अखेरच्या दिवशी डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या माऱ्याला सामोरे जाणे आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लीमन यांनी व्यक्त केली. लीमन म्हणाले, ‘जडेजाच्या माऱ्याला कसे तोंड द्यायचे, याची योजना केली असून माझ्या मते सोमवारी तुम्हाला कल्पना येईलच. खेळाडूंनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या घडीला जडेजाचा मारा खेळणे आमच्यासाठी आव्हान आहे. त्यासाठी एक-दोन मोठ्या भागीदारी होणे आवश्यक आहे.’ही माझी कसोटीतील सर्वोत्तम खेळी : साहारिद्धिमान साहा याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात केलेली शतकी खेळी आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे फलंदाजीवर सकारात्मक प्रभाव झाल्याचे साहाने सांगितले. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना साहा म्हणाला,‘माझ्या तीन शतकी खेळींपैकी ही सर्वोत्तम आहे. आम्हाला मोठ्या भागीदारीची गरज होती. पुजाराने मला सकारात्मकतेचा सल्ला दिला. सुरुवातीला १०-२० धावांच्या छोट्या भागीदारीचा विचार करण्याचा सल्लाही त्याने दिला होता.’पॅट कमिन्सचे चार बळीआॅस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्स सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १०६ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले. डावखुरा फिरकीपटू स्टीव्ह ओकीफेने १९९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना माघारी परतवले. ओकीफेने डावात ७७ षटके गोलंदाजी केली. भारतात आॅस्ट्रेलियन गोलंदाजाने एका डावात केलेली सर्वाधिक षटके ठरली. धावफलकआॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : सर्वबाद ४५१. भारत (पहिला डाव) : राहुल झे. वेड गो. कमिन्स ६७, विजय यष्टिचित वेड गो. ओकीफे ८२, पुजारा झे. मॅक्सवेल गो. लियोन २०२, विराट कोहली झे. स्मिथ गो. कमिन्स ०६, अजिंक्य रहाणे झे. वेड गो. कमिन्स १४, करुण नायर त्रि.गो. हेजलवूड २३, आश्विन झे. वेड गो. कमिन्स ०३, साहा झे. मॅक्सवेल गो. ओकीफे ११७, जडेजा नाबाद ५४, यादव झे. वॉर्नर गो. ओकीफे १६, ईशांत शर्मा नाबाद ००. अवांतर (१९). एकूण २१० षटकांत ९ बाद ६०३ (डाव घोषित). बाद क्रम : १-९१, २-१९३, ३-२२५, ४-२७६. ५-३२०, ६-३२८, ७-५२७, ८-५४१, ९-५९५. गोलंदाजी : हेजलवूड ४४-१०-१०३-१, कमिन्स ३९-१०-१०६-४, ओकीफे ७७-१७-१९९-३, लियोन ४६-२-१६३-१, मॅक्सवेल ४-०-१३-०. आॅस्ट्रेलिया (दुसरा डाव) : डेव्हिड वॉर्नर त्रि.गो. जडेजा १४, मॅट रेनशॉ खेळत आहे ०७, नॅथन लियोन त्रि.गो. जडेजा ०२. अवांतर (०). एकूण ७.२ षटकांत २ बाद २३. बाद क्रम : १-१७, २-२३. गोलंदाजी : आश्विन ४-०-१७-०, जडेजा ३.२-१-६-२.
टीम इंडियाला विजयाची संधी
By admin | Published: March 20, 2017 12:17 AM