ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 20 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवाच्या धक्क्यातून सावरून भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला आहे. मात्र प्रशिक्षक अनिल कुंबळेविनाच विराटसेनेने वेस्ट इंडिजकडे प्रयाण केले. तर अनिल कुंबळे आयसीसीच्या बैठकीसाठी लंडनमध्येच थांबला आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेला 23 जूनपासून सुरुवात होणार आहे
गेल्या काही काळारपासून अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यात मतभेदांच्या बातम्या येत असल्याने कुंबळेच्या लंडनमध्येच थांबण्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र आयसीसीच्या बैठकीसाठी कुंबळे मागे थांबल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेला अनिल कुंबळे आयसीसीच्या क्रिकेट कमिटीचा सदस्य आहे.
आयसीसीची वार्षिक सभा सोमवासपासून सुरू झाली असून, ही बैठक 23 जूनपर्यंत चालणार आहे. यादरम्यान अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीची बैठक 22 जून रोजी होणार आहे. " भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे हे आयसीसीच्या बैठकीसाठी मागे थांबणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज रवाना होईल." असे भारतीय संघाशी संबंधित सूत्रांनी सांगितले होते.
दरम्यान, विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील संबंध अधिकच बिघडले असून, विराटने कोणत्याही परिस्थितीत कुंबळेसोबत जुळवून घेणार नसल्याचे क्रिकेट सल्लागार समितीसोबत झालेल्या बैठकीत म्हटले होते. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत पुढच्या काळात अधिकच रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहेत.