ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने आज जाहीरात दिली आहे. झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचर यांच्या बरोबरचा करार २०१५ आयसीसी वर्ल्डकपनंतर संपला तेव्हापासून मुख्य प्रशिक्षकपदाची जागा रिक्त आहे. फ्लेचर यांच्यानंतर रवी शास्त्री यांनी संघ संचालक म्हणून मार्गदर्शकाची भूमिका बजावली.
बोर्डाने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले असून, निवडीसाठी नऊ निकष ठेवले आहेत. यात प्रशिक्षकाकडे हिंदी भाषेत संवाद साधण्याचे कौशल्य हवे असेही म्हटले आहे तसेच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराची कोणतीही वादाची पार्श्वभूमी नसावी असेही म्हटले आहे.
उमेदवारांना १० जूनपर्यंत भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करता येईल. फ्लेचर यांच्यानंतक माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकपपर्यंत संघ संचालक म्हणून मार्गदर्शकाची भूमिका बजावली.
संजय बांगर, भारत अरुण आणि आर.श्रीधर यांनी अनुक्रमे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावली. झिम्बाब्वे दौ-यातील एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने संजय बांगरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.