- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय संघाने गेल्या तीन वर्षांत मिळविलेले यश हे सांघिक असून त्यामध्ये कोणत्याही एकट्या व्यक्तीचे विशेष योगदान नाही. रवी शास्त्री व अनिल कुंबळे येतील आणि जातील; पण आज भारत कसोटीमध्ये अव्वल स्थानावर आहे. याचे सगळे श्रेय खेळाडूंना आहे, असे भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ बुधवारी रवाना झाला. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित होते. या वेळी शास्त्री यांनी सांगितले, ‘‘मी भूतकाळातील गोष्टी घेऊन पुढे आलेलो नाही. आज भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर यश मिळविले आहे. श्रीलंकेच्या मागील दौऱ्यापासून आतापर्यंत मी परिपक्व झालो असून, गेल्या दोन आठवड्यांतही खूप परिपक्व झालो आहे.’’यादरम्यान, शास्त्री यांना भरत अरुण यांच्या निवडीबाबतही विचारण्यात आले. त्यांच्यात कोणते गुण विशेष आहेत ज्यामुळे त्यांची निवड करण्यात आली, असे विचारले असता शास्त्री म्हणाले, ‘‘यासाठी त्यांची कामगिरी तपासा म्हणजे मुख्य कारण मिळेल. त्यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी मोठी असून त्यांचा अनुभव मोठा आहे. ते १५ वर्षांपासून प्रशिक्षक आहेत आणि ‘अ’ श्रेणी संघ, १९ वर्षांखालील संघ, ज्युनिअर विश्वचषक संघ यांसोबत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. ते खेळाडूंना माझ्यापेक्षा जास्त चांगले ओळखतात.’’त्याचप्रमाणे, ‘२०१५ विश्वचषक स्पर्धेत आपल्या गोलंदाजांनी ८० पैकी ७७ बळी घेतले. अरुण यांची पात्रता काय आहे, हे मला सांगण्याची गरज नाही. सर्वांनीच त्यांची कामगिरी पाहिली आहे,’ असेही शास्त्री यांनी या वेळी म्हटले. कोणताही दबाव नाही : विराट कोहली मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या मैदानाबाहेरील घटनांमुळे कामगिरीवर काही फरक पडेल का, या प्रश्नाला उत्तर देताना कोहलीने सांगितले, ‘‘या सर्व घडामोडींमुळे माझ्या कामगिरीवर अतिरिक्त कोणताही दबाव नसेल, असे मला वाटते. माझं काम मी पुरेपूर जाणून आहे. आम्ही एक संघ म्हणून यश मिळविण्याचा प्रयत्न करू. सर्वांनीच खडतर परिस्थितीला तोंड दिले आहे. जोपर्यंत मी कर्णधार आहे, जबाबदारी घेत राही.’’काही दिवसांपूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्य सौरभ गांगुली याने कोहलीला प्रशिक्षकाचे कार्य समजून घ्यावे लागेल, असे वक्तव्य केले होते. त्याअनुषंगाने कोहलीला विचारले, की आता प्रशिक्षक तुझ्या पसंतीचे असल्याने तुला प्रशिक्षकाचे काम समजून घेणे सोपे जाईल का? यावर कोहली म्हणाला, ‘‘आम्ही गेल्या तीन वर्षांत एकत्र काम केलेले आहे. मला आणखी काही समजून घेण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. आम्ही याआधीही एकत्र काम केलेले असून आमच्याकडून काय अपेक्षा आहेत व कशी परिस्थिती आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठी आम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील, असे मला वाटत नाही.’’