ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. २२ - टीम इंडियाचा चाहता सुधीर गौतमवर बांगलादेशविरुद्धचा सामना संपल्यावर बांगलादेशच्या समर्थकांनी दगडफेक केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे बांगलादेशी समर्थकांच्या या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.
सुधीर गौतम हा क्रिकेटवेडा तरुण भारतीय संघाचा चाहता असून भारताच्या प्रत्येक सामन्यात त्याची उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. तिरंग्याने रंगलेला, हातात भारतात झेंडा घेऊन मैदानात फिरणारा सुधीर प्रत्येक सामन्यात दिसतो. बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सुधीर बांगलादेशमध्ये गेला असून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत २-० ने पराभूत झाला आहे. रविवारी बांगलादेशने भारताला धूळ चारल्यावर बांगलादेशी समर्थकांनी अक्षरशः धुडगूस घातला. सामना संपल्यावर गौतम मैदानाबाहेर पडत असताना बांगलादेशच्या समर्थकांनी त्याच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे सुधीरही घाबरला. काही वेळाने स्थानिक पोलिस तिथे पोहोचले व त्यांनी सुधीरला सुखरुप रिक्षेपर्यंत सोडले. मात्र यावरही बांगलादेशी समर्थकांचा राग शमला नाही. त्यांनी सुधीरच्या रिक्षेमागे पळून रिक्षेचा कव्हर फाडून टाकला. 'आम्ही वर्ल्डकपचा वचपा काढला असून आता मैदानाबाहेरही याचा बदला घेऊ' अशा घोषणा या बांगलादेशी समर्थकांनी दिल्या.
यापूर्वी पाकिस्तान व भारतामधील सामन्यांमध्ये मैदानासोबतच प्रेक्षकांमध्येही टशन दिसायची.सामना पराभूत झाल्यावर दोन्ही देशांचे समर्थक आमनेसामने यायच्या घटना घडायच्या. आता पाकची जागा बांगलादेशी समर्थकांनी घेतली असे दिसते. सोशल मिडीयावरही बांगलादेशी समर्थकांवर टीकेची झोड उठली आहे.
ट्विटरील काही निवडक प्रतिक्रिया
> सुधीर गौतमवरील हल्ला दुर्दैवी घटना, बांगलादेशमध्ये पाहुण्यांना अशी वागणूक दिली जाते का - पराग
> भारताला पराभूत केल्यावर बांगलादेशी समर्थकांनी जल्लोष करणे स्वाभाविक आहे मात्र भारतीय संघाच्या चाहत्यावर हल्ला करणे निषेधार्हच - तरुणज्योती
> तन्वीर अहमद बांगलादेशी चाहत्याने या घटनेवर नाराजी व्यक्त करत सुधीर गौतमची माफी मागितली आहे. 'सुधीर तुझ्यावर हल्ला करणारे बहुधा मुर्ख लोकं होती, आमचा पराभव झाल्यावर काही चाहते खेळाडूंवर हल्ला करतात, त्यामुळे तू अशा चाहत्यांकडे दुर्लक्ष कर, सॉरी सुधीर' अशी भावनिक प्रतिक्रिया त्याने दिली.