दुबई : भारत आयसीसी एकदिवसीय मानांकनामध्ये तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे, तर दक्षिण आफ्रिका संघाने अव्वल स्थान कायम राखले आहे. आॅस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी कायम आहे. जून महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने सहभागी होत असलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडला पिछाडीवर सोडत तिसरे स्थान पटकावले आहे. भारत ११७ मानांकन गुणांसह तिसऱ्या आणि न्यूझीलंड ११५ मानांकन गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तान आठव्या स्थानी आहे तर त्यांच्यापेक्षा ९ मानांकन गुणांनी पिछाडीवर असलेला वेस्ट इंडिज संघ नवव्या स्थानी आहे. इंग्लंड आणि ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत त्यानंतरचे अव्वल सात मानांकन असलेले संघ आयसीसी क्रिकेट विश्वकप २०१९ साठी थेट पात्र ठरणार आहेत. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांना मानांकन गुणांचे नुकसान सहन करावे लागले आहे. पाकिस्तानचे ९० वरून ८८ मानांकन गुण झाले आहेत तर वेस्ट इंडिजचे ८३ वरून ७९ मानांकन गुण झाले. बांगलादेश सातव्या तर श्रीलंका सहाव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका पाच गुणांच्या आघाडीसह अव्वल स्थानी आहे तर आॅस्ट्रेलिया ११८ मानांकन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ आणि विश्वकप २०१९ या स्पर्धांचे यजमानपद भूषविणार असलेला इंग्लंड संघ पाचव्या स्थानी असून लढवय्या अफगाणिस्तान संघ दहाव्या स्थानी आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे ११ व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)
टीम इंडिया तिसऱ्या स्थानी
By admin | Published: May 02, 2017 1:16 AM