इडनगार्डन : शनिवारी इडनगार्डन मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमविल्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा जबरदस्त वर्षाव झाला. विशेष म्हणजे सामना संपल्यानंतरही दुसऱ्या दिवसापर्यंत सोशल मीडियावर हा कौतुक सोहळा सुरूच होता. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींपासून सेलिब्रेटींपर्यंत सारेच टीम इंडियाचे आणि खासकरून भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचे गुणगान गात होते. त्यातच टिष्ट्वटरवर कौतुक सोहळ्याची सुरुवात खुद्द मास्टर ब्लास्टर सचिनने करताना कोहलीच्या शानदार खेळीचे कौतुक केले. कोहलीने अर्धशतक झळकावल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सचिनकडे बॅट उंचावून त्याला मानवंदना दिली. या सन्मानाबद्दल सचिनने कोहलीचे टिष्ट्वटरद्वारे आभार व्यक्त केले आणि यानंतर कोहली आणि टीम इंडियावर कौतुकाचा जबरदस्त वर्षाव झाला. सचिनने संघाचे कौतुक करताना टिष्ट्वट केले, ‘‘भारतीय संघाचा शानदार विजय. जबरदस्त खेळी आणि सन्मान दिल्याबद्दल कोहलीचे आभार. सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया माझ्याकडे हात उंचावून पॅव्हेलियनमध्ये गेली तेव्हा असं वाटत होतं, की मी अजूनही संघ सोडलेला नाही.’’ तसेच वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटर ब्रायन लारानेदेखील कोहलीचे कौतुक करताना फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर पाकिस्तान गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक खेळाकडेही लक्ष वेधले. लाराने टिष्ट्वट केले, ‘‘आव्हानात्मक खेळपट्टीवर कोहलीची सर्वोत्तम फलंदाजी. शाब्बास. गोलंदाजीत शाहीद आफ्रिदी आणि शोएब मलिक यांच्याकडून खूप अपेक्षा होती.’’ माजी फिरकीपटू अनिल कुंबळे म्हणाला, ‘‘शानदार विजय. विराट कोहलीची अप्रतिम फलंदाजी. युवराज सिंगसह केलेली भागीदारी महत्त्वाची ठरली.’’ तर अन्य एक महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने टिष्ट्वट केले, ‘‘कोहलीने नेहमीप्रमाणे शानदार खेळी केली. ज्या प्रकारे तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये फलंदाजी करतो ते पाहणे शानदार आहे.’’ (वृत्तसंस्था)विराट कोहली अन्य खेळाडूंच्या तुलनेत खूप पुढे असून त्याच्या जोरावरच भारताने इडनगार्डनवरील पाकविरुद्धची अपयशी मालिका तोडून विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्याविरुद्धची अपराजित मालिका कायम राखली.- बिशनसिंग बेदी, माजी क्रिकेटपटूधावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची आणखी एक जबरदस्त खेळी. त्याने संघासाठी विजय सोपा केला.- संजय मांजरेकर, माजी क्रिकेटपटूशाब्बास मित्रांनो. विराट कोहलीने दबावामध्ये शानदार फलंदाजी केली. गोलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी केली. असेच पुढे खेळत राहा.- युवराज सिंगसगळीकडे भारत, भारत, भारत. शाब्बास कोहली. टर्निंग पिचवर रन मशिनची अप्रतिम फलंदाजी. शाब्बास युवराज, महत्त्वपूर्ण विजय आहे हा.- हरभजन सिंगदबावामध्ये कोहलीची सर्वोत्तम खेळी. तो यापेक्षा चांगली खेळी करू शकतो का?- माहेला जयवर्धने, माजी क्रिकेटपटू - श्रीलंकाचांगला सामना झाला. पाकिस्तानसाठी दु:खद झाला. बल्ले बल्ले बल्ले इंडिया. कोहली तू रॉकस्टार आहेस.- सानिया मिर्झा, टेनिसपटूकिती शानदार विजयासह आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये पुनरागमन केले. अप्रतिम जिद्द. भारतीय संघाचे अभिनंदन. महेंद्रसिंह धोनी आणि सहकाऱ्यांचे शानदार प्रदर्शन. विराट कोहली खूप अप्रतिम खेळी केली. परिपक्व खेळाचे शानदार उदाहरण. जबरदस्त खेळाडू, असाच खेळत राहा.- अनुराग ठाकूर, बीसीसीआय सचिव विराटचा स्वत:वर मोठा विश्वास : मलिककोलकाता : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकही विराट कोहलीच्या खेळीचा फॅन झाला असून, त्याने संघाला कोहलीच्या खेळीतून शिकण्याचे आवाहन केले आहे. विराट कोहली हाच दोन्ही संघांमधील मोठे अंतर असल्याचे त्याने सांगितले. विराटची स्तुती करताना मलिक म्हणाला, ‘‘विराटचा स्वत:वर विश्वास आहे आणि हीच त्याची मोठी ताकद आहे. तो परिस्थिती ओळखतो. मुश्कील आणि सपाट खेळपट्टीवर तो वेगवेगळ्या पद्धतीने खेळतो. यामुळेच तो सातत्याने मोठ्या खेळ्या खेळत आहे.’’ तो म्हणाला, ‘‘आमच्या संघाने त्याच्याकडून शिकले पाहिजे. स्वत:च स्वत:चा गुरू झाले पाहिजे.’’