नवी दिल्ली : भारतीय संघाने आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला हरविल्यास टीम इंडियाला १० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस मिळणार आहे. भारतीय संघ सध्या फॉर्ममध्ये असून, सलग १९ सामन्यांमध्ये विजयी ठरला आहे. मात्र, येत्या २३ तारखेपासून आॅस्ट्रेलियाविरु द्ध पुण्यात सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळविल्यास भारतीय संघाला १० लाख डॉलर मिळतील. कसोटी क्रि केट क्र मवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आयसीसीकडून टीम इंडियाला हे बक्षीस देण्यात येणार आहे. आयसीसीच्या मानांकनात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी आणि बक्षिसावर दावा सांगण्यासाठी १ एप्रिल २०१७ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारताने विजय संपादन केल्यास टीम इंडिया सर्वोच्च स्थानी कायम राहून संघाला बक्षिसाच्या रकमेवर दावा करता येईल. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती. मात्र, २०१५ पासून ही रक्कम १० लाख डॉलर इतकी करण्यात आली.आॅस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला असून, या ठिकाणी ते चार कसोटी सामने खेळणार आहेत. भारतीय संघाने आॅक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा पराभव करीत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले होते. भारताने न्यूझीलंडला ३-० आणि इंग्लंडला ४-० ने व्हाईटवॉश दिला. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरु-द्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने २०८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे गेल्या चार महिन्यांमध्ये भारतीय संघाने सलग १९ सामने जिंकले आहेत. २०१५मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीनंतर भारताचा पराभव झालेला नाही हे विशेष.बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठीचा भारतीय संघ आॅस्ट्रेलिया विरुद्धदेखील कायम ठेवण्यात आला आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ पहिल्या कसोटीस सामोरा जाईल. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला कांगारूंचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात आहे आणि याचा धसका आॅस्ट्रेलियानेदेखील घेतला आहे. कोहलीची विकेट घेण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाने योजना आखण्यासदेखील सुरुवात केली. मिशन विराट कोहली याअंतर्गत आॅस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज गोलंदाजांचीदेखील मदत घेतली जात आहे. (वृत्तसंस्था)
...तर टीम इंडियाला मिळणार १० लाख डॉलर
By admin | Published: February 17, 2017 12:32 AM